For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींची वाराणसीत उमेदवारीची हॅट्ट्रिक

06:50 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींची वाराणसीत उमेदवारीची हॅट्ट्रिक
Advertisement

अमित शाह, राजनाथ सिंह, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती

Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी

लोकसभा निवडणुकीच्या एकूण 7 टप्प्यांपैकी चार टप्प्यांचे मतदान संपले आहे. आता पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. स्वत:चा अर्ज दाखल करण्याआधी मोदींनी गंगेचे पूजन केले आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 1 जून रोजी वाराणसीमध्ये मतदान होणार आहे.

Advertisement

गंगा पूजन करत मोदींनी वाराणसीसोबतचे मागील 10 वर्षांचे ऋणानुबंधांच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान मोदी यावेळी काहीसे भावुक झाले होते. गंगामातेने मला दत्तक घेतले असल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे. लोकांचे माझ्यावरील प्रेम पाहून माझ्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस आणखी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान मोदींचे नामांकन पाहता वाराणसी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दशाश्वमेध घाटावर गंगामातेचे पूजन केल्यावर पंतप्रधान मोदींनी कालभैरव मंदिरात जात दर्शन घेतले. तेथून ते थेट उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी 4 प्रस्तावकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला आहे.

रालोआ नेते हजर

भाजप प्रमुख जगतप्रकाश न•ा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाहृ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, जनसेना प्रमुख पवन कल्याण, हमचे अध्यक्ष जीतनराम मांझी, उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, उत्तरप्रदेशचे मंत्री ओमप्रकाश राजभर, रालोदचे प्रमुख जयंत चौधरी, अम्बुमणि रामदास, जी.के. वासन, प्रमोद बोरो, चिराग पासवान यांच्यासह रालोआचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींचे 4 प्रस्तावक

1 पंडित गणेश्वर शास्त्राr : यांनीच अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभमुहूर्त निश्चित केला होता.

2 बैजनाथ पटेल : ओबीसी समुदायाशी संबंधित पटेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने अन् समर्पित स्वयंसेवक.

3 लालचंद कुशवाह : ओबीसी समुदायाशी संबंधित कुशवाह यांना प्रस्तावक म्हणून मिळाली संधी

4 संजय सोनकर : दलित समुदायाशी संबंधित सोनकर यांनाही प्रस्तावक होण्याची संधी प्राप्त.

पंतप्रधान मोदींचा ट्विट

बाबा विश्वनाथांच्या नगरीतील देवरुप जनतेला वंदन आणि नमस्कार! आज माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण या काशीच्या प्रत्येक कणाला नमन करत आहे. रोड शोमध्ये मला काशीवासीयांकडून प्राप्त स्नेह आणि आशीर्वाद पाहून मी भारावून गेलो आणि काहीसा भावूकही झालोय. तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या सावलीत 10 वर्षे कशी गेली कळलेच नाही. गंगा मातेने मला बोलाविले होते, आज गंगामातेने मला दत्तक घेतले आहे असे मोदींनी स्वत:च्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या भेटवस्तूची चर्चा

पंतप्रधान मोदींना यावेळी रालोआतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी खास भेटवस्तू दिली.  पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप भेट म्हणून दिला. यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणी आता वाद देखील उभा ठाकला असून अनेक जण पटेल यांच्यावर जोरदार टीका करत आहेत.

ना स्वत:चे घर, ना गाडी

पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे त्यांच्या एकूण संपत्तीचा तपशील समोर आला आहे. पंतप्रधान मोदींकडे 52 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर स्टेट बँकेत त्यांची दोन खाती असून यातील एक गांधीनगर तर दुसरे वाराणसी येथील शाखेत आहे. गुजरातमधील खात्यात 73 हजार 304 रुपये तर वाराणसी येथील खात्यात केवळ 7 हजार रुपये जमा आहेत. तर मोदींची एसबीआयमध्ये 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची मुदतठेव आहे. मोदींनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. याचबरोबर त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या असून त्यांचे एकूण वजन 45 ग्रॅम तर किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये आहे. मोदींकडे स्वत:चे घर तसेच जमीन देखील नाही. त्यांची एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपयांची आहे.

Advertisement
Tags :

.