अन्यथा तुझाही 'तुषार खरात करू', आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांना सज्जड दम?
अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे शेतकरी जनावरांसह आमरण उपोषण करू
म्हसवड : दुष्काळी माण तालुका सध्या दुष्काळाने होरपळून निघाला असून तारळी धरणातून तातडीने पाणी मिळावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अप्पर तहसिलदार कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला. माण तालुक्याचा पूर्व भागात पाण्यासाठी वणवण सुरु असून वर्षभरात तारळी धरणातून एकही आवर्तन पाणी देण्यात आले नाही, त्यामुळे शेतकरी पाण्यासाठी आक्रोश करत आहेत.
शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. मात्र सरकारकडून पाणी मिळण्याऐवजी स्वतःला जलनायक म्हणवणाऱ्या मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून फोनवरून धमक्या दिल्या जात आहेत. आंदोलन करू नको, अन्यथा तुझाही तुषार खरात करू, असा दम दिला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रशासनाने पाण्यासाठी निघालेला मोर्चा रोखण्यासाठी जमाव बंदी आदेश लागू केला. मात्र शेतकऱ्यांनी ठोस भूमिका घेत मोर्चा काढून तारळी सिंचन योजना उपकार्यकरी अभियंता इंगुलकर यांना निवेदन दिले आहे.
प्रशासन मंत्र्यांच्या प्रचंड दबावाखाली काम करत आहे. शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असून जमिनी ओसाड पडल्या आहेत. जनावरं पाण्यावाचून उन्हात भटकत आहेत. येत्या दोन दिवसात माण पूर्व भागात तारळी धरणातून पाणी दिले नाही, अथवा शासन नियम टेल टू हेडप्रमाणे समान पाणी वाटप झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सर्व शेतकरी जनावरांसह आमरण उपोषण करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी दिला आहे. दरम्यान म्हसवडमध्ये शेतकऱ्यांनी काढलेल्या अर्धनग्न मोर्च्यांची जिल्हाभरात चर्चा सुरू असून शासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.