तान्या चौधरीला हातोडाफेकमध्ये सुवर्णपदक
वृत्तसंस्था / जयपूर (राजस्थान)
येथे सुरू असलेल्या 2025 सालातील पाचव्या खेलो इंडिया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सोमवारी चंदीगड विद्यापीठाची महिला अॅथलिट तान्या चौधरीने हातोडाफेक प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेमध्ये जैन विद्यापीठाची कीर्तना आणि शिवाजी विद्यापीठाचा ऋषीप्रसाद देसाई हे वेगवान धावपटू ठरले.
राजस्थानमधील सात शहरांमध्ये खेलो इंडियाची पाचवी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा येथे होत असून यामध्ये 222 विद्यापीठांचे 4448 अॅथलिट्स 23 क्रीडा प्रकारात पदकांसाठी झुंझ देत आहेत. सदर स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरण, राजस्थान राज्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौर्णिमा विद्यापीठात भरविली आहे.
चंदीगड विद्यापीठाची महिला अॅथलिट्स तान्या चौधरीने महिलांच्या हातोडाफेक प्रकारात 64.29 मी.ची नोंद करत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. यापूर्वी तान्याने या स्पर्धेत सदर क्रीडा प्रकारात 60.61 मी.चा विक्रम नोंदविला होता. महिलांच्या हातोडाफेकमध्ये पंजाब विद्यापीठाच्या हकीकत कौरग्रेव्हाने 51.90 मी.ची नोंद रौप्य पदक तर पंजाब विद्यापीठाच्या अमनदीप कौरने 45.06 मी.ची नोंद करत कांस्यपदक मिळविले.
महिलांच्या गोळाफेकमध्ये चंदीगड विद्यापीठाची शिक्षा हिने सुवर्णपदक घेतले.तिने 15 मी.चे अंतर नोंदविले. पदक तक्त्यामध्ये सध्या चंदीगड विद्यापीठ 13 सुवर्णपदकांसह चौथ्या स्थानावर असून गुरूनानक देव विद्यापीठाने 30 सुवर्ण, 10 रोप्य आणि 12 कांस्य पदकांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे.
सोमवारी या स्पर्धेतील सायंकाळच्या सत्रामध्ये कीर्तनाने जैन विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत तिने 11.94 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक, लव्हली विद्यापीठाच्या टीना पारेकने रौप्यपदक तर हिमाचलप्रदेश विद्यापीठाच्या सम्रीती जमवालने कांस्यपदक घेतले.
ऋषीप्रसाद देसाईला सुवर्ण
शिवाजी विद्यापीठाच्या ऋषीप्रसाद देसाईने 10.53 सेकंदांचा अवधी घेत पुरूषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या लौकिक मेलगेने 10.59 सेकंदांचा अवधी घेत रौप्य तर सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या जय भोईरने 10.86 सेकंदांचा अवधी घेत कांस्य पदक घेतले.
फिल्ड आणि ट्रॅक क्रीडा प्रकारात रविंद्रनाथ टागोर विद्यापीठाच्या बुसरा खानने महिलांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना 18 मिनिटे 15.27 सेकंदांचा अवधी नोंदविला. या क्रीडा प्रकारात बहिनाबाई विद्यापीठाच्या पवारा धन्याने रौप्य पदक मिळविले. पुरुषांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत ललित नारायण मिथीला विद्यापीठाच्या त्रिलोककुमारने सुवर्णपदक मिळविताना 15 मिनिटे 06.16 सेकंदांचा अवधी घेतला. दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाच्या गौरव यादवने या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकाविले.
महिलांच्या फुटबॉल या क्रीडा प्रकारात गुरूनानक विद्यापीठ आणि चौधरी बनसीलाल विद्यापीठ भवानी यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. उपांत्य सामन्यात गुरूनानक देव विद्यापीठाने लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचा 2-1 तर चौधरी बनसीलाल विद्यापीठाने गुरू जांभेश्वर विद्यपीठाचा 1-0 असा पराभव केला. महिलांच्या हॉकी या क्रीडा प्रकारात कलिंगा टेक्नॉलॉजी संघाने उपांत्य सामन्यात गुरूनानक देव विद्यापीठाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात आयटीएम विद्यापीठाने महर्षी दयानंद विद्यापीठाचा 5-1 असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.