तन्वी, उन्नती, रक्षिता श्री यांची आगेकूच
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भारतीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा, उन्नती हुडा, रक्षिता श्री रामराज यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवित येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मुलांमध्ये फक्त ज्ञाना दत्तूला आगेकूच करता आली.
अग्रमानांकित तन्वी शर्माने इंडोनेशियाच्या ओइ विनार्तोवर 15-12, 15-7, आठव्या मानांकित उन्नती हुडाने अमेरिकेच्या अॅलिस वांगचा 15-8, 15-5 आणि दहाव्या मानांकित रक्षिताने एका गेमची पिछाडी भरून काढत सिंगापूरच्या आलियाह झाकारियाचा 11-15, 15-5, 15-8 असा पराभव केला. मुलींनी पदकच्या फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली असली तरी मुलांमध्ये फक्त ज्ञाना दत्तूनेच आगेकूच केली आहे. मुलांच्या एकेरीत त्याने 15 व्या मानांकित आपल्याच देशाच्या सूर्याक्ष रावतवर 11-15, 15-6, 15-11 अशी मात केली. मिश्र दुहेरीत भव्या छाब्रा व विशाखा टोपो या चौदाव्या मानांकित जोडीने डेन्मार्कच्या आस्के रोमर व जस्मिन विलिस यांचा 15-13, 15-11 असा पराभव केला.
भारताने या स्पर्धेत 25 सदस्यीय पथक उतरविले असून मुलींच्या एकेरीत आणखी पदकांची भर घालण्याची शक्यता आहे. मुलींनी स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 11 वैयक्तिक पदके मिळविली आहे. तन्वीची पुढील लढत चीनच्या लि युआन सुनशी होणार आहे. तिसऱ्या फेरीत लि युआनने नवव्या मानांकित लिआओ जुइ-चि हिला 15-12, 15-12 असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. रक्षिताची पुढील लढत लंकेच्या चौथ्या मानांकित रनिथमा लियानगेशी होईल. लियानगेने मलेशियाच्या लेर कि एन्गचा 15-9, 15-12 असा पराभव केला.
मुलांच्या एकेरीत 17 वर्षीय ज्ञाना दत्तूला वैयक्तिक स्पर्धा सुरू होण्याआधी स्नायुदुखीचा त्रास होत होता. त्याने अडखळत प्रारंभ केला. पण लय सापडल्यानंतर त्याने सूर्याक्षचा पराभव केला. नंतर रौनक चौहानने चीनच्या लि झि हांगविरुद्ध कडवा प्रतिकार केला. पण अखेर त्याला 11-15, 12-15 असा पराभव स्वीकारावा लागला. याशिवाच्या भारताच्या लालथझुआलाही संयुक्त अरब अमिरातच्या रियान मलहानकडून पराभव स्वीकारावा लागला.
