तन्वी शर्माचे पदक निश्चित
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
अग्रमानांकित भारताच्या तन्वी शर्माने येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले. तिने जपानच्या साकी मात्सुमोटोवर तीन गेम्समध्ये रोमांचक विजय मिळवित आगेकूच केली.
16 वर्षीय तन्वी शर्माने पहिला गेम गमविल्यानंतर डावखुऱ्या मात्सुमोटोवर 13-15, 15-9, 15-10 अशी मात केली. मात्र आठव्या मानांकित उन्नती हुडाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. थायलंडच्या दुसऱ्या मानांकित अनयापत फिचित्फोकडून तिला 32 मिनिटांच्या खेळात 12-15, 13-15 असा पराभव स्वीकारावा लागल्याने तिची पदकाची संधी हुकली.
मिश्र दुहेरीत भाव्या छाब्रा व विशाखा टोपो यांनाही शेवटच्या आठ फेरीत पराभूत व्हावे लागले. चिनी तैपेईच्या हुंग बिंग फु व चौ युन अॅन यांच्याकडून त्यांना 9-15, 7-15 असा पराभव स्वीकारावा लागला.