तन्वी शर्मा, उन्नती हुडाची विजयी सलामी
वृत्तसंस्था / गुवाहाटी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील वैयक्तिक गटामध्ये भारताच्या तन्वी शर्मा आणि उन्नती हुडा यांनी विजयी सलामी देत पुढील फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या इतर पाच बॅडमिंटनपटूंनीही दुसरी फेरी गाठली आहे.
मंगळवारी महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या टॉपसिडेड तन्वी शर्माने पोलंडच्या कॅलेटकाचा केवळ 11 मिनिटांत 15-2, 15-1 असा फडशा पाडत विजयी सलामी दिली तर दुसऱ्या एका सामन्यात आठव्या मानांकीत उन्नती हुडाने हाँगकाँगच्या लियु अॅनाचा 15-8, 15-9 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 23 मिनिटांत पराभव करत दुसरी फेरी गाठली. रक्षिता श्रीने कॅनडाच्या यांगवर 15-5, 15-9 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
मुलांच्या गटात भारताच्या 11 व्या मानांकीत रौनक चौहानने लंकेच्या टी.रुपथुंगाचा 15-3, 15-6, पंधराव्या मानांकीत सूर्याक्ष रावतने तुर्कीच्या इरोलचा 15-5, 15-8, भारताच्या हमरने अमेरिकेच्या तेनचा 15-11, 15-5 असा पराभव करत विजयी सलामी दिली आहे. भारताच्या ज्ञाना दत्तुने ब्राझीलच्या मेडोनिकावर 15-10, 15-13 अशी मात केली. मात्र भारताच्या के. व्हेन्नलाला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. थायलंडच्या सेहेंगने व्हेन्नलाचा 15-6, 15-5 असा फडशा पाडत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. भारताच्या 14 व्या मानांकीत भव्या छाब्रा, विशाखा टोपो आणि सी. लालरेमसिंगा तसेच टी. सुरी यांनीही पुढील फेरीत प्रवेश केला आहे.