तन्वी शर्मा, मनराज सिंग उपांत्यपूर्व फेरीत
जपानची टॉपसिडेड ओकुहारा, एचएस प्रणॉय पराभूत
वृत्तसंस्था/लखनौ
2025 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताची बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने जपानची माजी विश्वविजेती नोझोमी ओकुहाराचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला तर भारताच्या 19 वर्षीय मनराज सिंगने पुरूष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना आपल्याच देशाच्या अनुभवी एच. एस. प्रणॉयला पराभवाचा धक्का दिला.
16 वर्षीय तन्वी शर्माने यापूर्वी विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते. तर तिने चालु वर्षाच्या प्रारंभी झालेल्या अमेरिकन खुल्या 300 दर्जाच्या बॅडमिटन स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. तन्वी शर्माने जपानची माजी विश्वविजेती ओकुहाराचा 13-21, 21-16, 21-19 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना जवळपास तासभर चालला होता. महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात भारताच्या टॉपसिडेड उन्नती हुडाने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित करताना तस्नीम मीरचा 21-15, 21-10 असा पराभव केला.
पुरूष एकेरीच्या झालेल्या सामन्यात भारताच्या 19 वर्षीय मनराज सिंगने एच. एस. प्रणॉयचा 21-15, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये 43 मिनिटांच्या कालावधीत फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्रणॉयने 2023 साली विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक मिळविले होते. भारताच्या मिथुन मंजुनाथने आपल्याच देशाच्या सहाव्या मानांकीत तरुण मनपल्लीचा 21-16, 17-21, 21-17 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. भारताचा माजी टॉपसिडेड आणि 2021 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदांबी श्रीकांतने सनीत दयानंदवर 21-6, 21-16 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. श्रीकांतचा पुढील सामना प्रियांश राजावतशी होणार आहे.