तन्वी, आयुष अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ लोवा (अमेरिका)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या अमेरिकन खुल्या 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा आणि आयुष शेट्टी यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 16 वर्षीय बिगर मानांकित तन्वी शर्माने युक्रेनच्या सातव्या मानांकित पोलीना बुरोव्हाचा 21-14, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. तन्वीला विजयासाठी केवळ 34 मिनिटे झगडावे लागले. अलिकडच्या कालावधीतील तन्वीचा बुरोव्हावरील हा दुसरा विजय आहे. आता तन्वी शर्माचा अंतिम सामना अमेरिकेच्या टॉप सिडेड बिवेन झेंगशी होणार आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात या स्पर्धेत मानांकनात चौथे स्थान मिळविणाऱ्या आयुष शेट्टीने चीन तैपेईचा टॉप सिडेड चोयु तिएन चेनचा 21-23, 21-15, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. हा उपांत्य फेरीचा सामना 65 मिनिटे चालला होता. दुसऱ्या एका उपांत्य लढतीत कॅनडाच्या तृतीय मानांकित ब्रायन यांगने चीन तैपेईच्या लिओ जुओ फू याचा 21-10, 21-12 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. आता आयुष शेट्टी आणि कॅनडाचा यांग यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. आयुषने या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीन तैपेईच्या कनिष्ठ गटातील विश्वविजेता लीनचा 22-20, 21-9 असा पराभव केला होता. तर तन्वीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मलेशियाच्या लिसेनावर 21-13, 21-26 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली होती.