तनुष कोटियान, मुलानीने सावरला मुंबईचा डाव
वृत्तसंस्था/ कोलकाता
ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी ट्रॅाफीच्या हरियाणाविरुद्ध उपांत्यपूर्व लढतीत सुरुवातीच्या पडझडीनंतर गतविजेत्या मुंबईने दमदार पुनरागमन केले. कर्णधार अजिंक्य रहाणे, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, सिद्धेश लाड सारखे स्टार फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर तनुष कोटियान व शम्स मुलानी यांनी शानदार अर्धशतकी खेळी साकारत मुंबईचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 8 गडी गमावत 278 धावा केल्या होत्या. दिवसअखेरीस कोटियान 85 धावांवर खेळत होता.
प्रारंभी, मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. सलामीवीर आयुष म्हात्रे पहिल्याच षटकांत बाद झाला. आकाश आनंद, सिद्धेश लाड हे दोघेही स्वस्तात बाद झाले. याशिवाय, कर्णधार अजिंक्य रहाणेसह सुर्यकुमार यादव शिवम दुबे या स्टार खेळाडूंनीही सपशेल निराशा केली. कर्णधार रहाणे 31 धावा काढून आऊट झाला तर सुर्याला 9 तर दुबेला 28 धावा करता आल्या. अष्टपैलू शार्दुल ठाकूरही या सामन्यात काही करिष्मा दाखवू शकला नाही. 15 धावा काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. आघाडीची फळी झटपट बाद झाल्याने मुंबईची एकवेळ 7 बाद 113 अशी बिकट स्थिती झाली होती.
शम्स मुलानी, कोटियानची अर्धशतके
या बिकट स्थितीत शम्स मुलानी व तनुष कोटियान या दोघांनी आठव्या विकेटसाठी 165 धावांची दमदार भागीदारी करत हरियाणाच्या मेहनतीवर पाणी फिरवले. या जोडीने हरियाणाच्या गोलंदाजांचा समाचार घेत मुंबईला मजबूत स्थितीत नेले. शम्सने 178 चेंडूचा सामना करताना 10 चौकारासह 91 धावांची संयमी खेळी साकारली. त्याचे शतक अवघ्या 9 धावांनी हुकले. दुसरीकडे, कोटियानने त्याला चांगली साथ देताना 11 चौकारासह नाबाद 85 धावांचे योगदान दिले. मुलानी व कोटियान यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या दिवसअखेरीस 8 गडी गमावत 278 धावा केल्या आहेत. हरियाणाच्या अंशुल कंबोजने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर सुमीत कुमारने दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई पहिला डाव 81 षटकांत 8 बाद 278 (रहाणे 31, शिवम दुबे 28, शम्स मुलानी 91, तनुष कोटियान खेळत आहे 85, कंबोज 3 बळी, सुमीत कुमार 2 बळी).
उपांत्यपूर्व फेरीचे इतर निकाल
- जम्मू व काश्मीर प.डाव 8 बाद 228 वि केरळ
- विदर्भ प.डाव 6 बाद 264 वि तामिळनाडू
- सौराष्ट्र प.डाव 216 वि गुजरात प.डाव बिनबाद 21.