तनिशा क्रॅस्टो-ध्रुव कपिला दुसऱ्या फेरीत
महिला दुहेरीतही तनिशाची आगेकूच, किरण जॉर्ज,आयुष शेट्टी पराभूत
वृत्तसंस्था/ जकार्ता, इंडोनेशिया
भारताच्या तनिशा क्रॅस्टो व ध्रुव कपिला या युवा जोडीने इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची मोहिम विजयाने करीत दुसरी फेरी गाठली. तनिशा-ध्रुव या जोडीने यजमान इंडेनेशियाच्या अदनान मौलाना व इन्दाह काह्या सरी जमिल या जोडीवर 21-18, 21-14 अशी मात करीत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्यांची पुढील लढत मलेशियाच्या पांग रोन हू व सु यिन चेंग यांच्याशी होणार आहे. तनिशाने मंगळवारी महिला दुहेरीतही दुसरी फेरी गाठली असून अश्विनी पोनप्पासमवेत खेळताना तिने थायलंडच्या ओम्निचा जाँगसथापोर्नपार्न व सुकिता सुवाचाइ यांच्यावर 21-6, 21-14 अशी मात केली. त्यांची पुढील लढत मलेशियाच्या पेइ की गो व मेइ झिंग तेओह यांच्याशी होईल.
मिश्र दुहेरीत खेळणारी भारताची अन्य एक जोडी रोहन कपूर व रुत्विका शिवानी ग•s यांच्या मात्र पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. त्यांना इंग्लंडच्या ग्रेगरी मायर्स व जेनी मायर्स यांनी 21-9, 21-13 असे हरविले.
2023 ओडिशा मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेला आयुष शेट्टी तसेच किरण जॉर्ज यांना पुरुष एकेरीच्या पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. जागतिक अग्रमानांकित चीनच्या शि यु की याला त्याने कडवी लढत दिली. पण यु की ने त्याला 21-19, 21-19 असे नमविले. किरण जॉर्जला कोरियाच्या जेऑन ह्योओक जिनने 21-12, 21-10 असे हरवित स्पर्धेबाहेर घालविले. लक्ष्य सेनची लढत जपानच्या ताकुमा ओबायाशी तर प्रियांशू राजावतची लढत जपानच्याच कोदाय नाराओकाशी होणार आहे.
महिला एकेरीतही भारताची चांगली सुरुवात झाली नाही. रक्षिता श्री संतोष रामराजला जपानच्या तोमोका मियाझाकीकडून 21-17, 21-19 असे तर तान्या हेमंतला थायलंडच्या रॅत्चानोक इंटेनॉनकडून 21-14, 21-11 अशी हार पत्करावी लागली. पीव्ही सिंधूची लढत व्हिएतनामच्या थुइ लिन्ह एन्ग्युएनशी होणार आहे.