तनिषा-अश्विनी, सतीश विजेते
वृत्तसंस्था/ गुहाटी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे झालेल्या गुहाटी मास्टर्स सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत सतीश करुणाकरनने पुरुष एकेरीचे तर तनिषा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांनी महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत अनमोलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सतीश करुणाकरनने चीनच्या झू चेनचा 21-17, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 44 मिनिटात पराभव करत जेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताची टॉप सिडेड जोडी तनिष क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांनी चीनच्या झोयु आणि मेंग यांचा 21-18, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 43 मिनिटे चालला होता. या स्पर्धेत भारताची नवोदित बॅडमिंटनपटू अनमोल खराबला महिला एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या येनने खराबचा 14-21, 21-13, 21-19 असा पराभव केला.