तानाजी सावंत आणि लक्ष्मण गावकर यांना उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार
कुणकेरी आणि ओटवणे गावचे पोलीस पाटील ;
तहसिलदारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
ओटवणे | प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तानाजी सावंत आणि सचिव लक्ष्मण उर्फ शेखर गावकर यांना यावर्षीच्या सावंतवाडी तालुकास्तरीय उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावंतवाडी येथे झालेल्या महसूल दिन गौरव २०२५ या सोहळ्यात सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांच्याहस्ते या दोन्ही पोलिस पाटलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तानाजी सावंत कुणकेरी गावचे पोलीस पाटील असुन लक्ष्मण उर्फ शेखर गावकर हे ओटवणे गावच्या पोलीस पाटील पदी आहेत. दोन्ही पोलीस पाटील गेली सतरा अठरा वर्षे कार्यरत आहेत. शेखर गावकर यांना यापूर्वी उत्कृष्ट कार्याबद्दल तालुक्याचा उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार प्राप्त झाला होता. ग्रामस्थ आणि महसूल व पोलिस यांच्यामधील पोलीस पाटील हा महत्त्वाचा दुवा असुन गाव व तालुका पातळीवरील त्यांचे प्रशासनास आवश्यक सहकार्य नेहमीच असते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीत प्रत्येकाच्या संकटकाळी मदतीला धावून जात गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी प्रयत्नशिल असतात. तसेच पोलिस पाटील संघटनेच्या महत्त्वाच्या पदावर काम करताना तालुक्यातील पोलिस पाटलांना संघटीत करून संघटनेसाठी विशेष योगदान देत आहेत. तसेच गाव पातळीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासह गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि महसूल, पर्यावरण, सुरक्षितता, धार्मिक सलोखा राखण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल असतात. या दोन्ही पोलीस पाटीलांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे. गावच्या विकासासाठी आवश्यक कामांमध्ये त्यांनी मदत केली असून गावाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावातील सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचणार नाही यासाठी आवश्यक माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांनी वेळोवेळी दिली आहे. या दोन्ही पोलिस पाटलांच्या तालुक्यातील या सर्वोत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना हा तालुकास्तरीय पुरस्कार विभागुन देण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.