तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद : पर्यायी मार्गांवर ताण
भातकांडे स्कूल रोड, कपिलेश्वर उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी : अपघात होण्याची दाट शक्यता, परिसरातील नागरिकांचे हाल
बेळगाव : तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद केल्याने कपिलेश्वर उड्डाणपूल व भातकांडे स्कूल रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अवघ्या दोनच दिवसांत वाहतूक कोंडीने वाहनचालक वैतागले आहेत. त्याचबरोबर पालकांमधूनही चिंता व्यक्त होत आहे. आधीच महात्मा फुले रोड बंद असल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली असताना त्यातच आता उड्डाणपूल नसल्याने अधिकच भर पडली आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने तानाजी गल्ली रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला. सोमवार दि. 10 पासून रेल्वेगेट बंद करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठी चर मारण्यात आली आहे.
रेल्वेगेटबाबत फेरविचाराची मागणी
उड्डाणपुलाला विरोध केल्यामुळे तो रद्द करण्यात आला. परंतु रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय झाला. यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी वळसा घालावा लागत आहे. त्याचबरोबर महाद्वार रोड, देशपांडे पेट्रोलपंप, कर्नाटक चौक या परिसरातही वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. त्यामुळे रेल्वेगेटबाबत फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे.