कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अतिक्रमणे, रिक्षांच्या गराड्यात हरवलेला तानाजी चौक !

03:20 PM Aug 01, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

 सांगली / संजय गायकवाड :

Advertisement

गणपती पेठेसह सांगलीतील प्रमुख बाजारपेठांना जोडणाऱ्या आणि मध्यवर्ती चौक म्हणून ओळख असणाऱ्या शहरातील तानाजी चौकाला वाढती अतिक्रमणे आणि रिक्षांचा गराडा कायम आहे. फेरीवाले आणि मोकाट जनावरे, भटकी कुत्री यांचे ओझे झेलणारा तानाजी चौक कधी मोकळा श्वास घेणार असा शहरवासियांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement

सांगली हे बाजारपेठांचे गाव म्हणून दक्षिण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथील गणपती पेठ, मार्केट यार्ड, विष्णूअण्णा फळमार्केट ही होलसेल खरेदी विक्रीची ठिकाणे म्हणून ओळखली जातात, त्याशिवाय दत्त मारूती रोड, सराफ बाजार, कापड पेठ, हरभट रोड, शिवाजी मंडई ही किरकोळ खरेदीनी ठिकाणे म्हणून येथे बाराही महिने लोकांनी मोठी गर्दी असते.

सांगलीच्या व्यापारी पेठा या एकमेकांना जोडलेल्या आहेत. अगदी पायी गेले तरी सांगलीतील किमान चार वेगवेगळ्या पेठामध्ये सहजपणे फेरफटका मारता येतो. त्यामुळे आजही अनेक जण दत्त मारुती रोडने खरेदी करत अगदी हरभट रोड, गारमेंट चौकापासून टिळक चौक व शिवाजी मंडईपासून ते गणपती पेठ व बुरूड गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत निवांतपणे खरेदी करत असतात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी सांगलीच्या बाजारपेठामध्ये गर्दी असते.

सांगलीतील रस्ते अरुंद आहेत. सत्तावीस वर्षात अपवाद वगळता मनपा क्षेत्रातील रस्त्यांने रूंदीकरण झालेले नाही. त्यात चौकांचाही समावेश आहे. तानाजी चौक हा त्यातीलच एक प्रमुख चौक आहे. सांगलीच्या हरभट रोड आणि मित्रमंडळ चौकाकडून कर्नाळ पोलीस चौकी व पुढे बायपास रोड आणि कर्नाळ, नांद्रे पलूसकडे जाणारी सर्व वाहने याच चौकातून पुढे जातात. तर गणपती पेठेतील मालमोटारी व पटेल चौकातून ये जा करणारी वाहनेही याच चौकातून पुढे जात असतात.

तानाजी चौकानजिक सिंधी मार्केट, जिल्हयातील सर्वात मोठी होलसेल पेठ म्हणून गणपती पेठ, जवळच धान्यबाजार, राणी सरस्तीदेवी कन्या शाळा, मनपाची नवीन इमारत, शनिवारचा सर्वात मोठा आठवडा बाजार, बुरूड गल्ली, जुनी भाजी मंडई असा सगळा गर्दीने व्यापलेला भाग तानाजी चौकानजिक आहे. त्यामुळे रात्री नऊपर्यंत शहरातील वाहने आणि कर्नाळ रोडकडे जाणारी वाहने यांची गर्दी असते. त्यानंतर रात्री साडेआकरापर्यंत येथून जाणाऱ्या खासगी आरामगाडयांची ये जा सुरू असते. आता काही महिन्यापासून मोठी वाहने बऱ्यापैकी कॉलेज कॉर्नर आणि बायपास रोडने ये जा करू लागली आहेत. तरीही तानाजी चौकातील वाहतूकीची कोंडी कायम आहे.

तानाजी चौकाच्या एका बाजूला रिक्षा स्टॉप आहे. गणपती पेठेकडे जाणाऱ्या रस्याच्या दिशेला कोपऱ्यावर बसणारे फेरीवाले आणि शेतीची अवजारे विकणारे विक्रेते, भरीस भर म्हणून पाणीपुरी आणि फिरून विकणारी खारी टोस्ट यांचे गाडे येथे असतात. येथे अनेकवेळा मोकाट जनावरांच्या झुंडी रस्त्यात मध्येच उभे राहिलेले असतात. भटक्या कुत्र्यांचीही समस्या कायम आहे. मागील अनेक वर्षापासून ज्या ज्या चौकामध्ये अतिक्रमणे वाढत चालली आहेत. त्यात तानाजी चौकाचाही समावेश आहे. या चौकामध्ये कुणाचा कुणाला पायपोस नाही. प्रत्येकजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे येथे रोजची वादावादी ठरलेलीच आहे. तानाजी चौकातील फेरीवाले आणि विक्रेत्यांची अतिक्रमणाकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे.

या चौकातून मोठ्या वाहनांना संथ गतीने जावे लागते. येथे यापुर्वीही अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. भविष्यातही येथे अपघातही होवू शकतात. केवळ वाहतूक पोलीस नियुक्त करून उपयोग नाही. येथील अतिक्रमणे हटविण्याबरोबरच या चौकातून ये जा करणाऱ्या वाहनचालकांनी शिस्त बाळगण्याची आवश्यकता आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त सत्यम गांधी यांनी तातडीने तानाजी चौकाचे रूंदीकरण आणि सुशोभिकरण करण्यासाठी पावले उचलावीत अशी व्यापारी व नागरिकांतून मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article