For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेन्नाळीजवळील अपघातात तामिळनाडूचा कँटरचालक ठार

10:57 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेन्नाळीजवळील अपघातात तामिळनाडूचा कँटरचालक ठार
Advertisement

महामार्गावर खांबाला धडकून अपघात

Advertisement

बेळगाव : भरधाव कँटर पलटी झाल्याने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बेन्नाळी नर्सरीजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात तामिळनाडूतील कँटरचालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. डोणी अण्णा राज (वय 37) रा. तिरुनलवेली, तामिळनाडू असे अपघातात जागीच ठार झालेल्या कँटरचालकाचे नाव असून क्लिनर चल्लुतोरे (वय 47) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या अपघातानंतर तब्बल तासभर महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कँटर कोल्हापूरहून धारवाडकडे जात होता. बेन्नाळीजवळ रस्त्याशेजारील खांबाला ठोकरून कँटर उलटला. चालक केबिनमध्ये अडकला होता. तो जिवंत असणार म्हणून पोलिसांनी तब्बल पंधरा मिनिटे वाहतूक अडवून त्याला बाहेर काढले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. रात्री काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांना बरीच धडपड करावी लागली. अपघातानंतर काही वेळात वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.