वाळवा-शिराळा तालुक्यात उसाला घेरले 'तांबेरा' ने!
कुरळप / महादेव पाटील :
वाळवा तसेच शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांचे उसाचे मळे तांबेरा रोगाने लालेलाल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीमागची साडेसाती काही सुटायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या शेतीभोवती कधी अवकाळीचा, कधी दुष्काळाचा तर कधी व्यापाऱ्यांकडून लुटला जाण्याचा फेरा सतत राहत आला आहे. शेतकऱ्यांची याच्यातून कधीकाळी सुटका होईल व दुसऱ्याला घास चारणारा शेतकरी स्वतः समाधानाचा घास खाईल, अशी परिस्थिती शेतीप्रधान भारत देशात कधी येईल की नाही हे सांगता येत नाही. आता तर ऊस उत्पादकांच्या ऊसाला तांबेरा रोगाने पुरते घेरून टाकले आहे. यातून उसाचे उत्पादन निश्चित घटणार असून उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सध्याचे वाळवा व शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील चित्र आहे.
वाळवा तसेच शिराळा तालुक्याला लागून असलेला हा वारणा पट्टा वारणा व मोरणा नदीच्या कृपेने सुजलाम सुफलाम पट्टा म्हणून ओळखला जातो. या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे ऊस हे प्रमुख बागायती पिक आहे. या परिसरातील, वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द, कुरळप, करंजवडे, देवर्डे, चिकुर्डे, ठाणापुडे व शिराळा तालुक्यातील चिखली, सागाव, राजारामबापू विश्वास व वारणा सहकारी साखर कारखान्याच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. पाणीपुरवठा योजना या गेल्या ४० ते ४५ वर्षापासून कार्यान्वित आहेत. त्यामुळे या परिसरातील जवळपास पाच ते सहा हजार एकर क्षेत्र ऊस लागवडीखाली राहते.
हजारो टन उसाचे उत्पादन घेणारा या परिसरातील शेतकरी सध्या भयभीत व चिंताग्रस्त होऊन बसला आहे. याचे कारण म्हणजे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ऊस पिकावरती वाढू लागला आहे. उसाच्या पानावरती हा तांबेरा रोग विस्तारतो आहे. उसाच्या पानावर त्याचा रंग पांढरट लालसर स्वरूपाचा आहे. 'तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उसावरती लालसर स्वरूपाचे डाग पडतात. उसाचे पूर्ण पान झाकोळले जाते. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत जाणारा असल्याने सर्व क्षेत्रावरती तो कमी कालावधीत पसरलेला निदर्शनास येतो.
या परिसरातील तांबेरा रोगाला बळी पडलेल्या उसाचे पीक हे लागण, खोडवा व नेडवा या स्वरूपाचे आहे. लागण या पद्धतीतून शेतकऱ्याला उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते. दुर्दैवाने तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव हा उसाच्या लागण पिकावरतीच मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्या ऊस पद्धतीतून उसाचे उत्पादन चांगले मिळते तोच लागण पद्धतीचा ऊस तांबेरा रोगाला बळी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढून राहिली आहे. को- ९२००५ व को- ०-२६५, को-१०००१ या उस जातीच्या उसाला तांबेरा रोगाची भरमसाठ प्रमाणात लागण झाली आहे. लागण, खोडवा व नेडवा या तीनही प्रकारच्या ऊस पद्धतीत तांबेरा रोगाचा शिरकाव झाल्याने उसाचे उत्पादन निश्चितपणे घटणार आहे याबाबत शंका नाही.
- फवारणीसाठी कमी दरामध्ये ड्रोनची सुविधा उपलब्ध....
सद्यस्थितीत विश्वास साखर कारखाना कार्यक्षेत्रातील पश्चिम भाग तसेच वारणा नदीकाठच्या ऊस क्षेत्रामध्ये तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव को ९२००५ व को-०२६५ या ऊस जातींवर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मे महिन्यापासून झालेल्या पावसाची सुरुवात. ज्यामुळे ऊस पिके तांबेरा रोगाला बळी पडली आहेत. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी अशा ऊस जातींच्या लागवडीसंबंधी मार्गदर्शन केले जाते. बियाणे बदलाच्या उद्देशाने शुद्ध बियाण्याचा पुरवठाही कारखान्याकडून करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे. अशा शेतकऱ्यांना ऊस क्षेत्रामध्ये फवारणीसाठी कमी दरामध्ये ड्रोनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच शेतकऱ्यांना व्ही.एस.आय. मधील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. यापुढेही हे मार्गदर्शन सुरू राहणार आहे.
-विराज नाईक संचालक विश्वास सहकारी साखर कारखाना व चेअरमन विराज उद्योग समूह शिराळा
- गाळप हंगामाच्या तोंडावरच तांबेरा...
सन २०२५-२६ मधील ऊस गाळप हंगाम आक्टोबर नोव्हेंबर यादरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. ऊस तुटायला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी राहिला आहे. अतिशय अल्प कालावधी राहिला असताना तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ऊस पिकावरती झाला आहे. सध्या ऊस पीक परिपक्व टप्प्यावरती आहे. आहे. उसाच्या रसामध्ये रिकव्हरी निर्माण होण्याचा हा कालावधी आहे. उसाच्या लागण पद्धतीच्या उसामध्ये रसाचे मुबलक प्रमाण राहते. पण हाच लागण पद्धतीचा ऊस मोठ्या प्रमाणात तांबेरा रोगाला बळी पडला आहे. याचा जसा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे तसा तो साखर कारखान्यांनाही बसणार आहे.
- शेतकऱ्यांचा वाढता आर्थिक खर्च
ऊसावरती आलेला तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दूर व्हावा, कमी व्हावा याकरिता सध्या शेतकरी त्याच्यावरती उपाययोजना करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च वाढत चालला आहे. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमतीही जास्त आहेत. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढीव स्वरूपाचा होत चालला आहे. हा वाढीव स्वरूपाच्चा खर्च करूनही ज्या पद्धतीने तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव कमी होणे आवश्यक आहे. त्या पद्धतीने होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
- हाता तोंडाला आलेले ऊस पीक....
वर्षभर कष्टाने पिकवलेला ऊस हाता तोंडाला आलेला असताना तांबेरा रोगाला बळी पडतो आहे. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय त्रासदायक आहे. तांबेरा रोगाचा मारा झाल्याने साहजिकच उसाच्या उत्पादनात आता कमालीची घट होणार हे निश्चित आहे. एकरी मिळणाऱ्या उसाच्या उत्पादनात घट झाल्याने याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावरतीही होणार आहे. त्यामुळे हा तांबेरा रोग शेतकऱ्यांचा डोकेदुखी झालेला विषय आहे. तांबेरा रोगामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटणार, हे मात्र निश्चित आहे.