लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तालुका सज्ज
ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात
वार्ताहर/किणये
विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी तालुका सज्ज झाला आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील मूर्तिकार गणरायाच्या मूर्तीवर मंगळवारी दुपारीही अखेरचा हात फिरवताना दिसत होते. तसेच गणेशाला विविध प्रकारचे अलंकार करताना दिसत होते. मंगळवारी सायंकाळी तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू होती. तरीही बाप्पाच्या आगमन सोहळ्याच्या तयारीसाठी भक्तांची धडपड सुरूच होती. गणेशोत्सव हा आनंदाची पर्वणी देणारा सण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पिरनवाडी, मच्छे, बेळगुंदी, हलगा, बस्तवाड, देसूर,हिडलगा, कंग्राळी खुर्द आदी भागातील बाजारपेठांमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य भाविक खरेदी करताना दिसत होते. ग्रामीण भागातील मूर्तिकारांनी गेल्या तीन महिन्यापासूनच गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली होती. यातील बहुतांशी मूर्तींचे कामकाज पूर्ण झाले आहे.