For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तालुका सज्ज

03:03 PM Aug 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तालुका सज्ज
Advertisement

ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात 

Advertisement

वार्ताहर/किणये 

विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.  लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी तालुका सज्ज झाला आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील मूर्तिकार गणरायाच्या मूर्तीवर मंगळवारी दुपारीही अखेरचा हात फिरवताना दिसत होते. तसेच गणेशाला विविध प्रकारचे अलंकार करताना दिसत होते. मंगळवारी सायंकाळी तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू होती. तरीही बाप्पाच्या आगमन सोहळ्याच्या तयारीसाठी भक्तांची धडपड सुरूच होती. गणेशोत्सव हा आनंदाची पर्वणी देणारा सण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पिरनवाडी, मच्छे, बेळगुंदी, हलगा, बस्तवाड, देसूर,हिडलगा, कंग्राळी खुर्द आदी भागातील बाजारपेठांमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य भाविक खरेदी करताना दिसत होते. ग्रामीण भागातील मूर्तिकारांनी गेल्या तीन महिन्यापासूनच गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली होती. यातील बहुतांशी मूर्तींचे कामकाज पूर्ण झाले आहे.

Advertisement

तर गेल्या दोन दिवसापासून काही गणेश मूर्तींवर  मूर्तिकार अखेरचा हात फिरवताना दिसत होते. गणेशमूर्तींना अलंकार सजविण्यात येत होते. काही गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंगळवारी सायंकाळीच आपल्या गावी गणरायाच्या मूर्ती घेऊन गेलेले आहेत. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीची आगमन सोहळ्याची मिरवणूक बुधवारी गणेश चतुर्थी दिवशी काढण्यात येणार आहे. तालुक्याच्या विविध गावांमध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा दिवसापासूनच मंडप घालण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी हालते देखावे साजरे करण्यात येत आहेत. पिरनवाडी, बहाद्दरवाडी, बेळगुंदी, मच्छे, कर्ले, राकसकोप, आदी ठिकाणच्या काही मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती बनवलेल्या आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती अधिकाधिक आकर्षक दिसण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून मूर्तिकार डोळ्यात तेल घालून काम करताना दिसत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या पंधरा दिवसापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाचा मुहूर्त मेढ कार्यक्रम केलेला आहे. विविध प्रकारचे आकर्षक पडदे तसेच बाजारात मिळालेले विविध प्रकारचे फुलांचे डेकोरेशन करण्यात आलेले आहेत.

Advertisement
Tags :

.