तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
शहरातील खड्डे अन् स्मशानभूमीची स्वच्छता राखा : विविध मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन
खानापूर : शहरातील रस्त्यावरील पडलेले खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत तसेच मोक्षधाम स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात यावी, स्मशानभूमीची वेळोवेळी देखभाल करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेस पक्षातर्फे नगरपंचायतीला देण्यात आले. नगरपंचायतीचे महसूल अधिकारी गंगाधर कांबळे यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपल्या मागण्यांची पूर्तता करू, असे आश्वासन यावेळी दिले. या निवेदनात म्हटले आहे की, गणेशचतुर्थी जवळ आल्याकारणाने गोवा, महाराष्ट्र तसेच इतर ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त असलेले लोक गणपती सणानिमित्त येतात. शहरातील तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. यासाठी गणेश चतुर्थीच्या पूर्वी शहरातील खड्डे तातडीने बुजवावेत आणि रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करावेत, तसेच मोक्षधाम स्मशानभूमीची अंत्यत दुरवस्था झाली आहे.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची स्वच्छता राखा
तसेच स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अंत्यविधी जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच स्मशानभूमी परिसरात अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणी पाण्याची योग्य सोय करणे गरजेचे आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप तसेच मोक्षधाममधील वीजपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने रात्रीच्यावेळी अंत्यविधी करताना नागरिकांची गैरसोय होत आहे. यासाठी स्मशानभूमीत वीजपुरवठा, स्वच्छता आणि पाण्याची तातडीने व्यवस्था करण्यात यावी, मोक्षधाम येथे एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, यशवंत बिर्जे, ग्रा. पं. संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, संदीप शेमले, खानापूर येथील ज्येष्ठ नागरिक परशराम बिरसे व मोताप्पा गावडे उपस्थित होते.