तालिबानही करणार पाकिस्तानची कोंडी
पाकिस्तानकडे जाणाऱ्या नद्या अडविण्याची योजना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एकीकडे भारत पाकिस्तानची जलकोंडी करत असताना आता अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनानेही हेच धोरण अवलंबिण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातून पाकिस्तानकडे वहात जाणाऱ्या नद्यांवर धरणे बांधून पाकिस्तानचे पाणी अडविण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज झाला आहे.
या योजनेचा प्रारंभ अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाणाऱ्या कुनार नदीवर धरण बांधून केला जाणार आहे. कुनार नदीवरचे हे धरण लवकरात लवकर बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्या देशाच्या विदेश व्यवहार विभागाने प्रसिद्ध केली आहे. हे धरण बांधण्याचा आदेश अफगाणिस्तानच्या प्रशासनाने नुकताच काढला आहे. अफगाणिस्तान हे धरण स्वबळावर बांधणार असून विदेशी कंपन्यांचे साहाय्य शक्यतोवर न घेण्याचेही ठरविण्यात आले आहे.
काबूल नदी सर्वात मोठी
अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांपैकी काबूल ही सर्वात मोठी नदी आहे. या नदीला कुनार नदी मिळते. कुनारच्या पाण्यामुळे काबूल नदीच्या पात्राचा विस्तार झाला आहे. ही नदी पुढे सिंधू नदीला पाकिस्तानात मिळते. सिंधू नदीला या नदीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी मिळते. कुनार नदीवर अफगाणिस्तानने धरण बांधल्यास काबूल नदीमध्ये होणाऱ्या विसर्गावर नियंत्रण मिळविणे अफगाणिस्तानला शक्य होणार आहे. याचा सरळ परिणाम सिंधू नदीला मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर होणार असल्याने हे संभाव्य धरण पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरेल, असा इशारा पाकिस्तानमधील अनेक तज्ञांनी आपल्या प्रशासनाला दिला आहे.
जलसार्वभौमत्वावर भर
2021 पासून अफगाणिस्तानात तालिबानचे प्रशासन आहे. या प्रशासनाने सत्तेवर येताच आपल्या जलसार्वभौमत्वाचा पुरस्कार केला आहे. अफगाणिस्तानच्या पाण्यातून अफगाणिस्तानचा विकास झाला पाहिजे. हे पाणी घेण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. पाकिस्तानला आजवर हे पाणी घरबसल्या मिळाले आहे. पण आता आम्ही असे होऊ देणार नाही. या पाण्याचा उपयोग अफगाणिस्तानाच कसा होईल हे पाहिले जाईल, असे तालिबानच्या प्रशासनाने स्पष्ट केले.
तालिबान-पाकिस्तान वाद
दोन्ही देशांना एकमेकांपासून अलग करणारी ब्रिटीशांनी ओढलेली ड्यूरांड रेषा हे दोन्ही देशांमधील वादाचे सर्वात मोठे कारण आहे. अफगाणिस्तानने ही रेषा कधीच स्वीकारली नव्हती. या रेषेमुळे आमचा मोठा भूभाग पाकिस्तानला विनाकारण देण्यात आला आहे, असे या देशाचे म्हणणे आहे. तेव्हापासूनच दोन्ही देशांमध्ये संघर्ष असून सध्याच्या जलसंघर्षालाही याची पार्श्वभूमी आहे.
जलविकासात भारताचे साहाय्य
अफगाणिस्तानच्या दुर्गम भागात पाणीपुरवठा करण्यासाठी त्या देशाने काही योजना साकारल्या आहेत. या योजनांमध्ये विविध नद्यांवर धरणे बांधण्याचे प्रकल्पही समाविष्ट आहेत. अशा काही धरणांच्या बांधकामांना भारताचे साहाय्य मिळणार आहे. भारताने पूर्वीपासूनच अफगाणिस्तानात अनेक पायाभूत विकास प्रकल्प साकारले आहेत. त्यामुळे भारताचे साहाय्य घेण्याचा अफगाणिस्तानचा विचार आहे.
भारत-अफगाणिस्तान चर्चा
अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी नुकताच भारताचा दौरा केला आहे. अफगाणिस्तानच्या पाणीपुरवठा व्यवस्था विस्ताराला भारताने सहकार्य करावे, अशी त्या देशाची इच्छा आहे. यासंबंधातील चर्चा या दौऱ्यात झाली असण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण, या दौऱ्यानंतर त्वरित अफगाणिस्तानने कुनार नदीवर धरण बांधण्याची घोषणा केली.