गोव्याची प्रतिभावान मल्लखांब खेळाडू : युतिका सतरकर
राष्ट्रीय खेळात गोव्याला पदक मिळवून देणारी पहिली खेळाडू-आठ वेळा राज्याचे प्रतिनिधीत्व
नरेश गावणेकर /फोंडा
मल्लखांब हा भारतातील एक प्राचीन खेळ आहे. महाराष्ट्र राज्याचे या खेळात वर्चस्व राहिले आहे. गोव्यातही आता या देशी व पारंपरीक खेळाला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. युवा खेळाडू यात सहभागी होत असून चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. कोने-प्रियोळ येथील युतिका सतरकर ही वीस वर्षीय युवा खेळाडू प्रभावी योगदान देत असून तिने गुजरात येथे 2022 साली झालेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळात (नॅशनल गेम्स) दोरी मल्लखांबमध्ये गोव्याला कांस्यपदक मिळवून दिले आहे. राष्ट्रीय खेळात गोव्याला कांस्यपदक मिळवून देणारी ती पहिली खेळाडू ठरली असून आठ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत तिने गोव्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.
प्रियोळ येथील स्वस्तिक विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकत असताना ती मल्लखांब खेळाशी जोडली गेली. येथे तिने प्रथमच हा खेळ पाहिला. विद्यालयाचे शारीरिक शिक्षक लक्ष्मीकांत नाईक सर मल्लखांबचे प्रशिक्षण देत होते. सरांनी तिला या खेळात सहभागी होण्यास सांगितले. परंतू सुरुवातीला तिला या खेळाविषयी जरासे भय वाटले. पण लक्ष्मीकांत सरांच्या प्रोत्साहनामुळे ती शिबिरात दाखल झाली व हा खेळ तिने आत्मसात केला. त्यानंतर राज्य पातळीवरील आंतरशालेय स्पर्धेत तिने सहभाग घेऊन अनेक पारितोषिके पटकावली.
राष्ट्रीय स्पर्धेत आठ वेळा गोव्याचे प्रतिनिधीत्व
युतिकाने आतापर्यंत आठ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आहे. 2017 साली उज्जैन-मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय उपकनिष्ठ स्पर्धेत, 2018 विल्लुपूरम-तामिळनाडू येथे झालेल्या मिनी राष्ट्रीय स्पर्धेत व बांदोडा-फोंडा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत, 2019 साली अमरावती येथील पश्चिम विभागीय खेलो इंडिया, मिरज येथील स्कूल गेम्स स्पर्धेत, 2022 साली हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये तिने राज्याचे प्रतिनिधीत्व केले. 2022 मध्ये गुजरात येथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले. 2023 साली गोव्याने यजमान भूषविलेल्या 37 व्या राष्ट्रीय खेळात ती दोरीवरुन पडल्याने तिचे पदक हुकले होते.
अनेक संस्थेतर्फे सन्मान
युतिकाच्या मल्लखांबमधील अप्रतिम कामगिरीमुळे अनेक ठिकाणी गौरव करण्यात आला आहे. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ व चॅरिटेबल ट्रस्ट म्हार्दोळ, गोमंत कला असोसिएशन, गोवा ऑलिम्पिक संघटना, खोतोडे फुटबॉल प्रिमीयर लीग, अंत्रुज घुडियो, स्वस्तिक विद्यालय, सरस्वती स्पोर्ट्स व कल्चरल क्लब प्रियोळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रियोळ, स्वस्तिक शिशूवाटिका, लक्ष्मी स्पोर्ट्स व कल्चरल क्लब पंचमे-प्रियोळ, सतरकर महासंघ गोवा व सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब व ग्रामस्थ कोने-प्रियोळ या संस्थेतर्फे तिचा सन्मान करण्यात आला आहे.
गोवा मल्लखांब संघटनेचा पाठींबा
गोवा मल्लखांब संघटनेचे आश्रयदाते मंत्री सुदिन ढवळीकर यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन देऊन मदत केली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी ते नेहमीच खेळाडूंना मार्गदर्शन करीत असतात. त्याचबरोबर सचिव नारायण कुराडे इतर पदाधिकारी व प्रशिक्षक प्रज्योत नाईक यांचे पाठबळ लाभते. तिचे वडील राजू, आई विश्रांती, बहिण दिव्या व भाऊ रितिकेश यांचा तिला नेहमीच पाठींबा देत असतो. बहिण दिव्या ही सुद्धा मल्लखांब खेळाडू आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी कुराडे सर परराज्यातील प्रशिक्षकांची व्यवस्था करुन देतात. गोवा संघासाठी पूर्णवेळ प्रशिक्षक लाभल्यास खेळाडू अधिक प्रभावी कामगिरी करतील असे युतिकाने मत व्यक्त केले. राष्ट्रीय स्पर्धेत गोव्यासाठी पहिलेच कांस्यपदक पटकाविल्याबद्दल युतिकाला मंत्री सुदिन ढवळीकरांतर्फे रुपये पन्नास हजार व सतरकर महासंघ गोवातर्फे रुपये एक लाख देऊन गौरविण्यात आले होते.
इतर खेळातही प्राविण्य
युतिका सद्या फर्मागुडी-फोंडा येथील पीईएसच्या रवी सिताराम नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष कलाशाखेत शिकत आहे. दररोज संध्याकाळी ती स्वस्तिक विद्यालयाच्या मैदानावर मल्लखांबचा सराव करीत असते. मल्लखांबमुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो, स्टॅमिना वाढतो, शरीर लवचिक बनते, बौद्धिक विकास होतो. तसेच परिश्रम घेण्याची ताकद वाढते. यामुळे मल्लखांब बरोबरच युतिका योग, व्हॉलीबॉल व कब•ाr हे इतर खेळ खेळत आहे. व्हॉलीबॉल व कब•ाrमध्ये तिने आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेतला आहे. आगामी राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्यासाठी ती कठोर मेहनत घेत असून या स्पर्धेत पदक मिळविण्याचे तिचे प्रयत्न राहणार आहेत.