जिल्ह्यातील 5 शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिभाशोध परीक्षा
बेळगाव : सरकारी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी. या उद्देशाने एक व्यासपीठ उपलब्ध करण्यात येत आहे. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण विभाग, बेळगाव व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यातील 5 शैक्षणिक विभागातील सरकारी हायस्कूल आणि सरकारी निवासी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभाशोध परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा तालुका आणि जिल्हा पातळीवर आयोजित करण्यात आल्या होत्या. शालेयस्तरावरील परीक्षा 06 नोव्हेंबर घेण्यात आली होती.
या परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील 15 शैक्षणिक विभागातील इयत्ता नववी 27,280 तर आणि इयत्ता दहावीचे 25,716 अशा एकूण 52,996 मुलांनी ही परीक्षा दिली. प्रत्येक शाळेतून पहिले 10 स्थान मिळवणाऱ्या मुलांची तालुकास्तरावरील परीक्षेसाठी निवड करण्यात आली. तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्मयातून अव्वल 50 स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय प्रतिभाशोध परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. ही परीक्षा 28 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्हास्तरावर निवड झालेल्या 100 मुलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्गातील पहिल्या 3 मुलांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार व 10 हजार रोख रक्कम व पारितोषिक देण्यात येणार आहे.