Solapur News : मंगळवेढ्यात तलाठीवर लाचखोरीचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित निलंबन
तलाठींच्या गैरव्यवहारामुळे मंगळवेढ्यात शेतकऱ्यांना त्रास
मंगळवेढा : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी यांच्याकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी आल्याने याप्रकरणी चौकशी करुन यात तथ्य आढळून आल्याने मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथील तलाठी बी. के. कुंभार यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेबर महिन्यात यंदा अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामेकरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने तलाठी, कृषी अधिकारी यांना दिले होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन, शासकीय मदत मिळवून देण्यासाठी तलाठी कुंभार यांच्याकडून शेतकऱ्यांना पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.
शेतकरी ब लोकप्रतिनिधी यांच्याकडून आलेल्या तक्रारीची चौकशी प्रांताधिकारी यांच्या स्तरावरुन करुन याबाबत तलाठी कुंभार यांच्या निलंबनाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. तलाठी कुंभार यांनी केलेली चूक गंभीरअसल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांना सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली आहे.
एकीकडे अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. यात पिकांसह यंदा अन्य संसारपयोगी व कृषी साहित्यांचाही नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकर्याना आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांनाच बेठीस धरण्याचा प्रयत्न तलाठी यांच्याकडून होत असल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी यांनी पहिल्यांदाच कारवाईचा मोठा बडगा हाती घेतला आहे. यामुळे कामचुकार व लाचखोर तलाठी यांच्यात अस्वस्थता पसरली असून त्यांनी जिल्हाधिकारी यांचा चांगलाच धसका घेतला आहे.