न्या. उदय उमेश लळीत होणार पुढील सरन्यायाधीश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय उमेश लळीत यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यांच्या नावाची सूचना विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केंद्र सरकारला लिखित स्वरुपात केली आहे. प्रथेप्रमाणे आपल्या वारसदाराची सूचना विद्यमान सरन्यायाधीश करतात.
केंद्र सरकारला पाठविलेल्या सूचनेची एक प्रत सरन्यायाधीश रमणा यांनी न्या. लळीत यांनाही दिली आहे. भावी सरन्यायाधीश लळीत 27 ऑगस्टला पदभार हाती घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रमणा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत. त्यांनी भावी सरन्यायाधीशांच्या नावाची सूचना केंद्र सरकारला द्यावी, अशी विनंती केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरण रिजिजू यांनी पत्राद्वारे केली होती. न्या. लळीत यांचा कार्यकाळ केवळ 74 दिवसांचा असेल. ते 8 नोव्हेंबरला निवृत्त होतील. त्यानंतर न्या. धनंजय विष्णू चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश होतील.
49 वे सरन्यायाधीश
पदाचे शपथ ग्रहण केल्यानंतर न्या. लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश होणार आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयात विधीज्ञांमधून थेट नियुक्त होऊन सरन्यायाधीशपदापर्यंत पोहचणारे ते दुसरे न्यायाधीश ठरणार आहेत. अशा प्रकारे सरन्यायाधीश झालेले प्रथम न्यायाधीश एस. एम. सिक्री हे होते. ते जानेवारी 1971 मध्ये भारताचे 13 वे सरन्यायाधीश बनले होते.
2014 मध्ये नियुक्ती
न्या. लळीत हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता (वकील) म्हणून कार्यरत होते. 13 ऑगस्ट 2014 या दिवशी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी ते कोणत्याही न्यायालयाचे न्यायाधीश नव्हते.
तीन तलाकसंबंधी निर्णय
मुस्लीम समाजातील तोंडी तीन तलाकची पद्धत घटनाबाहय़ ठरविण्याचा ऐतिहासिक निर्णय देणाऱया घटनापीठाचे सदस्य म्हणून न्या. लळीत यांनी काम पाहिले. ही प्रथा घटनाबाहय़ ठरविण्याचा निर्णय या घटनापीठाने बहुमताने घेतला होता. त्या बहुमताचा ते एक भाग होते. त्यांनी या प्रथेविरोधात निर्णय दिला होता. रामजन्मभूमी संबंधीच्या हाताळणीतून मात्र त्यानी स्वतःला वगळले होते. कारण त्यांनी कथित बाबरी इमारत पाडविण्याचा कट रचल्याच्या प्रकरणातील एक आरोपी आणि भाजप नेते कल्याणसिंग यांच्यावतीने न्यायालयात काम पाहिले होते.