महेश कोनाडकर हल्ला प्रकरणी कडक कारवाई करा
आमदार जीत आरोलकर यांची मागणी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घेतली भेट
पेडणे : मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर झालेला खुनी हल्ला निंदनीय प्रकार आहे. यामध्ये गुंतलेल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे केली असल्याचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले. या प्रकरणात आपल्याला जे कोणी गुंतविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर आपण अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा आमदार आरोलकर यांनी दिला आहे. आमदार आरोलकर यांनी खुनी हल्ल्यात जखमी झालेले महेश कोनाडकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली, अशी माहिती स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिली.
मांद्रेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच महेश कोनाडकर यांच्यावर 4 रोजी आस्कावाडा मांद्रे येथे खुनी हल्ला झाला होता. हल्ला करताना ‘तुकां मायकल जांय’ असा प्रश्न विचारून त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले होते. त्यानंतर प्रथम तुये आणि त्यानंतर म्हापसा उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केले. तत्पूर्वी स्थानिक माजी आमदार दयानंद सोपटे, सरपंच मिंगेल फर्नांडिस, माजी सरपंच अॅड. अमित सावंत, माजी सरपंच प्रशांत नाईक, उपसरपंच तारा हडफडकर, पंचायतसदस्य किरण सावंत, धारगळचे माजी सरपंच भूषण नाईक, अनिकेत साळगावकर आदीसह अनेक राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन त्यांची विचारपूस केली होती.
दरम्यान, काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी राजकीय नेत्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता आणि तशा प्रकारचा प्रसार पूर्ण गोव्यात झाला होता. त्यानंतर गुरुवारी 5 रोजी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी महेश कोनाडकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या प्रकरणात ज्यांनी आपला हात असल्याचे वक्तव्य केलेले आहे. त्यांच्या विरोधात आपण अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा आमदार जीत आरोलकर यांनी दिला. दरम्यान, मांद्रेतील लोकप्रतिनिधी, विविध राजकीय कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी रात्री मांद्रे पोलिस स्थानकावर धडक देऊन 24 तासांत संबंधित संशयितांना त्वरित अटक करावी, तसेच यावेळी वापरलेले वाहनही जप्त करावे, अशी मागणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर उपस्थित होते.
खुनी हल्ल्यासाठी वापरलेले वाहन जप्त
मांद्रे पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने खुनी हल्ल्यासाठी वापरलेले वाहन जप्त केले आहे. तसेच दोन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित तीन संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.