महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करा
सोलापूर येथे प्रतिवर्षी शिवयोगी सिध्दरामेश्वर यांची यात्रा संपन्न होत असते. या वर्षी सुध्दा १४ ते १५ जानेवारी २०२४ रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची विटंबना काही समाजकंटकांनी केली आहे. या घटनेचा निषेध आज गडहिंग्लज तालुका लिंगायत धर्म सभा व समस्त लिंगायत बांधवाच्या वतीने करण्यात आला. महात्मा बसवेश्वरांनी १२ शतकामध्ये अनुभव मंटप म्हणजेच आजची आपली लोकशाही संसद स्थापन केली होती. या मध्ये समाजातील सर्व घटकांना समाविष्ट करून, त्यांच्यातील भेदभाव नष्ट करून त्यांना धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक स्वातंत्र्य दिले होते. त्याच बरोबर महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व धार्मिक सामाजिक स्वातंत्र्य निर्माण करून दिले होते. आणि भेदभाव नष्ट केला होता. अशा या महान महात्म्याची विटंबना म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे. असे गडहिंग्लज लिंगायत समाजाने प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. त्याचबरोबर या घटनेत जो कोणी दोषी समाज कंटक असेल. त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी समस्त लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.