उरण घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करा
श्रीराम सेना हिंदुस्थानची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : उरण (नवी मुंबई) येथील यशश्री शिंदे या तरुणींवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे. अन्य धर्मातील तरुणाकडून हे घृणास्पद कृत्य करण्यात आले आहे. या माध्यमातून हिंदू धर्मातील मुलींवर अत्याचार केले जात आहेत. या प्रकरणातील तरुणावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
उरण येथील यशश्री शिंदे या 20 वर्षी तरुणींवर दि. 26 जुलै रोजी अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये दाऊद शेख नामक तरुणाला अटक करण्यात आली आहे. अशा माध्यमातून हिंदू धर्मीय तरुणीवर एकतर्फी प्रेमाच्या प्रकरणातून अत्याचार करून खून केले जात आहेत. ही अत्यंत घृणास्पद घटना आहे. या माध्यमातून हिंदू तरुणींना लक्ष्य केले जात आहे. हा एक प्रकारचा दहशतवाद असून यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
देशातील कोणत्याही धर्मातील महिलांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांभीर्याने दखल घेऊन अशा प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रकरणे वेळीच रोखणे गरजेचे आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन संबंधितांवर दया न दाखवता कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.