दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करु
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूतानमध्ये गर्जना
वृत्तसंस्था / थिंपू
दिल्लीमध्ये ज्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांचे मंगळवारी भारताचा शेजारी देश असणाऱ्या भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आगमन झाले आहे. दिल्ली स्फोटाचा तपास होत आहे. जे दोषी असतील त्यांना, ते कोठेही असले, ती त्यांना शोधले जाईल आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळवून दिली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
आज मी भूतानमध्ये अत्यंत दु:खी अंत:करणाने येत आहे. हा दौरा पूर्वनिर्धारित होता. त्यामुळे मी तो करत आहे. दिल्लीत जी भीषणा घटना सोमवारी घडली, त्या घटनेमुळे साऱ्यांचेच हृदय हेलावले आहे. प्रत्येक नागरीक आज दु:खसागरात आहे. या घटनेत ज्यांना आपले प्राण गमवावे लागले, त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटो, अशी प्रार्थना मी करीत आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या आणि जखमींच्या पाठीशी आज सारा देश एकजुटीने उभा आहे. या घटनेचे अन्वेषण करणाऱ्या सर्व यंत्रणांच्या मी संपर्कात असून प्रत्येक घडामोडीची माहिती घेत आहे. दहशतवाद्यांना पकडल्याशिवाय आणि शिक्षा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास त्यांनी सर्व भारतीयांना दिला आहे.
भूतानशी मैत्री दृढ
भूतान हा इतिहासकाळापासून भारताचा मित्रदेश आहे. या देशाशी अधिकाधिक कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारताशी संबंध दृढ करण्यात भूतानचे माजी नरेश जिग्मे सिंघे वांगचुक यांचे महत्वाचे योगदान होते. भूतानमध्ये लोकशाहीची पाळेमुळे रुजविण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या काळात भारत आणि भूतान यांच्यातील संबंध अत्यंत जवळचे होते. भूतानचे विद्यमान नरेश नामग्याला वांगचुक हेही भारताचे निकटचे मित्र असून माजी नरेशांचीच परंपरा तितक्याच उत्कटतेने पुढे चालवत आहे, ही आनंदाची बाब आहे, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमध्ये आगमन झाल्यानंतर केली. त्यांची आज बुधवारी नामग्याल वांगचुक यांच्याशी चर्चा होणार आहे.
प्रकल्पांचे उद्घाटन करणार
भूतानमध्ये भारताच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बुधवारी केले जाईल. या प्रकल्पामुळे भूताच्या जलविद्युत निर्मिती क्षमतेत 40 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे या देशासाठी मोठे महत्व आहे. अन्यही काही प्रकल्पाची उद्घाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहेत, अशी माहिती आहे. भारताने भूतानमध्ये अनेक जलविद्युत प्रकल्पांना साहाय्य करण्याची योजना साकारली आहे. तसेच भूतानच्या विकासासाठी भारत सढळ हस्ते अर्थसाहाय्य करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात काही करारही करण्यात येण्याची शक्यता असून त्यासंबंधी आज बुधवारी चित्र स्पष्ट होणार आहे.