राणी चन्नम्मांच्या आदर्श कार्यातून स्फूर्ती घ्या!
जिल्हा प्रशासनाच्यावतीने राणी चन्नम्मा विजयोत्सव मोठ्या थाटात : किल्ला रस्ता, विकासाची मुहूर्तमेढ
वार्ताहर/काकती
राणी चन्नम्मा आमची सर्वांची आदर्श आहे. तिच्या अनेक कार्यातून स्फूर्ती घेणे आवश्यक आहे. तिचे जनप्रिय कार्यक्रम, नवे विचार आजही नवा लढा देण्यासाठी प्रेरणा देतात. विशेषत: या महोत्सवाच्या माध्यमातून राणी चन्नम्मा यांचे नाव दिल्लीत प्रसिद्धीस आले आहे. काकती गावची अनेक विकासकामे झाली असून, किल्ला रस्ता, विकासाची मुहूर्तमेढ झाली आहे. लागलीच कामाला सुरुवात होणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. राणी चन्नम्मा विजयोत्सव गुरुवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोठ्या थाटात साजरा झाला. मुक्तीमठाचे सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी, उदय हिरेमठ स्वामी यांचे त्यांना सानिध्य लाभले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा वर्षा मुचंडीकर होत्या. दीपप्रज्वलन, उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. नाडगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रस्तावना प्रांताधिकारी श्रवण नायक यांनी केले. व्यासपीठावर आमदार राजू सेठ, जि. प. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, व्याख्याते राजू पटेल, तहसीलदार नागराज, ग्रा. पं. उपाध्यक्षा रेणुका कोळी, हिंडाल्कोचे युनिट हेड कौशिक मिश्रा, संपर्क अधिकारी दिनेश नाईक, डॉ. एस. डी. पाटील, उपतहसीलदार सदाशिव साळुंखे, पीडीओ अरुण नाथबुवा उपस्थित होते.
माजी जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार व मंत्री जारकीहोळी यांनी 90 लाखाचा निधी मंजूर केला आहे. यापैकी किल्ला सिमेंट काँक्रीट रस्ता, किल्ला रस्ता व देसाई गल्ली प्रवेशद्वारासमोर भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. याशिवाय सर्व्हीस रस्ता व राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली. मुक्तीमठाचे शिवाचार्य स्वामींनी यांनी उभारण्यात येणाऱ्या दोन्ही स्वागत कमानींवर ‘राणी चन्नम्मा मोहर गाव काकती’ असा उल्लेख करण्याचे सूचविले. बेंगळूरचे व्याख्याते राजू पटेल यांनी हा उत्सव राणी चन्नम्मा वारसा इतिहासाच्या पानापुरता मर्यादित नाही तर लोकमाणसाच्या हृदयात आहे, असे सांगितले.
माजी ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांनी राणीच्या शौर्याची आठवण कथन केली. देसाई वारसदार व चन्नम्मा मूर्ती चौथऱ्यावर राणीची मूर्ती, संग्रामातील आठवणीतील कलाकृती साकारणारे महेश मासेकर, ज्युडो राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी खेळाडू, चन्नम्मा ज्योत घेऊन आलेले चन्नप्पा पुराणीकमठ, व्हळ्याप्पा दंड्डी आदींचा सत्कार करण्यात आला. सकाळी 9 वाजता मंत्री जारकीहोळी, आमदार राजू सेठ यांच्या हस्ते बलून व कबूतर सोडून विजयोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. बैलहोंगलहून आलेल्या वीर ज्योतीचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग सर्व्हीस रस्ता येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायाण्णा, राजवाड्यातील दरबारी यांच्या वेषभूषेतील मुले-मुली, विविध कलापथके, चित्ररथ, लोकनृत्य, वाद्यपथके यासह निघालेल्या मिरवणुकीत मंत्री जारकीहोळींसह मान्यवर होते. हजारो महिलाक्, ाgंढभकलश घेतलेल्या सुवासिनी सहभागी झाल्या होत्या. देसाई गल्लीत राणी चन्नम्मा नूतनीकरण चौथऱ्याचे उद्घाटन व राणी चन्नम्मांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.