For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन वसाहती निर्मितीसाठी तातडीने पाऊल उचला

11:17 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवीन वसाहती निर्मितीसाठी तातडीने पाऊल उचला
Advertisement

नगरविकास मंत्री भैरत्ती सुरेश यांची सूचना

Advertisement

बेळगाव : नगरविकास प्राधिकरणाने सर्वसामान्य जनतेला घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रथम सरकारी जागा उपलब्ध होते का ते पहा. जर सरकारी जागा नसेल तर संबंधित शेतकऱ्यांकडून जमीन घ्या. मात्र त्यामधील 50 टक्के वाटा हा शेतकऱ्याला द्या व नवीन वसाहती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना नगरविकास मंत्री भैरत्ती सुरेश यांनी बुडा आयुक्त व अधिकाऱ्यांना केली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी ही सूचना केली आहे. बेळगावसह संपूर्ण राज्यातील बुडा आयुक्तांना त्यांनी नवीन वसाहती निर्माण करण्यासाठी पाऊल उचलण्याची सूचना केली. बेळगावचे बुडा आयुक्त शकील अहम्मद यांच्यासह मनपा आयुक्त व मनपाचे इतर अधिकारीही या व्हिडिओ कॉन्फरन्सला उपस्थित होते. महानगरपालिकेच्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्स झाली.

किमान 100 एकर जमीन विकासासाठी घ्यावी. त्याठिकाणी सर्व विकासकामे करून जनतेला जास्तीत जास्त घरे कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. भूखंडांचे वाटप करताना नियमानुसार व गरजवंतांनाच त्याचे वाटप केले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे नवीन लेआऊट करताना नियमानुसार लेआऊट करावेत. त्यानंतर संबंधितांना खरेदी करून द्यावे. ज्या शहरामध्ये सरकारी जागा उपलब्ध नाहीत, त्या परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून जमीन घ्यावी. कोणत्याही प्रकारची दडपशाही किंवा बळजबरी न करता जमीन घ्यावी. ही जमीन घेताना शेतकऱ्यांना त्यामध्ये 50 टक्के मोबदला दिला पाहिजे, याची काळजीही घ्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

आज मनपाच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार

पहिल्या टप्प्यामध्ये बुडाशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी ते थेट संवाद साधणार होते. मात्र काही कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्स स्थगित करण्यात आली. बुधवारी पुन्हा मंत्री मनपाच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.