पीडीओवर हल्ला केलेल्यांवर त्वरित कारवाई करा
पंचायत विकास अधिकारी संघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : माडमगेरी (ता. यरगट्टी) येथील पीडिओ पंचायत विकास अधिकारी जयगौडा पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राज्य पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) कुशल विकास संघ बेळगाव जिल्हा शाखेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. पीडीओंनी गुऊवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निषेध नोंदवित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. हल्लेखोऱांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
पीडीओ जयगौडा पाटील हे 6 ऑक्टोबर रोजी माडमगेरी ग्राम पंचायत कार्यालयात सेवा बजावत असताना काही जणांनी ग्राम पंचायत कार्यालयात येऊन कागदपत्रांची (इ-स्वत्तू) मागणी केली. पीडीओ पाटील यांनी नकार दिल्याने त्य़ांच्यावर दबाब आणून हल्ला केला. शिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी चार जणांवर मुरगोड पोलीस स्थानकात गुन्हा झाला आहे. घटना घडून 10 दिवस उलटले तरी हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. हल्लेखोरांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी. तसेच ग्रामीण विकास-पंचायतराज खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्य़ांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना हाती करावी, अशा मागण्या केल्या आहेत.