For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांबाबत त्वरित कार्यवाही करा

11:09 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांबाबत त्वरित कार्यवाही करा
Advertisement

म. ए. समितीची कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Advertisement

बेळगाव : सीमाभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिनोळी (ता. चंदगड) येथे तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेमणुकीबाबत सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांनी निर्देश दिले होते. या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वीच सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांची मुंबई येथे भेट घेतली होती. सीमाभागातील विद्यार्थी तसेच तरुणांना प्रमाणपत्र, तसेच इतर कामांसाठी कोल्हापूरला ये-जा करावी लागते. त्याऐवजी शिनोळी येथे तहसीलदार दर्जाचा अधिकारी नेमावा, अशी मागणी समितीने केली होती. याची दखल घेत सीमा समन्वय मंत्र्यांनी अधिकारी नेमण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. सोमवारी समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोडल अधिकारी नेमण्याबाबत अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विषयक योजनांविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, वारकरी संघाचे अध्यक्ष शंकर बाबली, अनंत पाटील यांसह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.