ग्राम पंचायतींच्या निवडणुका वेळेत घ्या
कर्नाटक राज्य ग्रा. पं. सदस्य महासंघाची मागणी : ग्रामविकास-पंचायतराज मंत्र्यांना निवेदन
बेळगाव : राज्यातील ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपत आहे. परंतु पुढील निवडणुका घेण्यास अद्यापही राज्य सरकारने कोणतीच तयारी केलेली दिसत नाही. त्यामुळे या निवडणुका वेळेत घ्याव्यात तसेच मनरेगा व 15 व्या वित्त आयोगातील अनुदान त्वरीत ग्रामपंचायतींना द्यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत सदस्य युनियनच्यावतीने मंगळवारी ग्रामविकास व पंचायतराज मंत्र्यांकडे करण्यात आली.
ग्रामपंचायतीमधील विविध मागण्यांसाठी सर्व सदस्यांनी सुवर्ण विधानसौध येथे आंदोलन केले. 2025-26 या वर्षांसाठी देण्यात येणारे 15 व्या वित्त आयोगाचे अनुदान अद्याप ग्रामपंचायतींना मिळालेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींचा विकास खुंटला आहे. मनरेगा अंतर्गत राबविण्यात आलेल्या कामांची संबंधित साहित्याचा खर्च जानेवारी 2025 पासून जाहीर झालेला नाही. ग्रामपंचायतीतील घनकचरा विल्हेवाट युनिटमध्ये काम करणाऱ्या संजीवनी संघातील महिलांना मानधन द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
ग्राम पंचायतीमध्ये पिण्याच्या कामासाठी एक, रोजगार हमीच्या कामासाठी एक व इतर विकासकामांसाठी एक असे तीन अभियंते नियुक्त करावेत. एका अभियंत्याकडे अधिक ग्राम पंचायतीची जबाबदारी देऊ नये. काही ठिकाणी अनुदान वाटपात गैरव्यवहार झाला असेल तर त्याची तात्काळ चौकशी करावी, यासह इतर मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या. यावेळी बेळगावसह उत्तर कन्नड, धारवाड व इतर जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.