मनपा स्थायी समित्यांची निवडणूक घ्या
महापौर-उपमहापौर, सत्ताधारी गटाच्यावतीने प्रादेशिक आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेची रद्द करण्यात आलेली विविध स्थायी समित्यांची निवडणूक तातडीने घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सोमवारी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी व सत्ताधारी गटाच्यावतीने प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले. प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णावर यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त प्रादेशिक आयुक्तांनी निवेदनाचा स्वीकार केला. प्रादेशिक आयुक्तालयाकडून बेळगाव महानगरपालिकेच्या विविध स्थायी समित्यांची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. निवडणुकीचे वेळापत्रकही घोषित करण्यात आले होते. त्यानुसार कौन्सिल विभागाकडून निवडणुकीची सर्व तयारी करण्यात आली होती. सध्या महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांच्या सदस्यत्व अपात्रतेबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
त्यातच प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णावर यांनी स्थायी समितीची निवडणूक अचानक रद्द केली. अद्यापही पुढील तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकांअभावी विकासकामांवर परिणाम झाला आहे. निवडणुकीला विलंब झाला असल्याने तातडीने स्थायी समित्यांची निवडणूक घ्यावी, अशा मागणीचे निवेदन सोमवारी प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले. अतिरिक्त प्रादेशिक आयुक्तांनी निवेदनाचा स्वीकार करून येत्या आठ दिवसांत यावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली, नगरसेवक नितीन जाधव, श्रीशैल कांबळी आदी उपस्थित होते.