For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वणव्यांवर नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचला

06:01 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
वणव्यांवर नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचला
Advertisement

उत्तराखंडमधील वणव्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालय कठोर : पावसाच्या भरवशावर राहू नका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तराखंडमधील वणवे रोखण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने आम्ही पाऊस किंवा कृत्रिम पावसाच्या भरवशावर राहून शांत बसू शकत नसल्याचे म्हटले आहे. सरकारला याप्रकरणी प्रभावीपणे पावले उचलावी लागतील असे न्यायाधीश बी.आर. गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नमूद केले आहे. वणवे लागण्याच्या वाढत्या घटनांप्रकरणी चिंता व्यक्त करत याचिकाकर्त्याने सरकारला आदेश देण्याची मागणी केली आहे.

Advertisement

दोन वर्षांपूर्वी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली होती. आतापर्यंत सरकारवर त्यावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही. याचमुळे सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागली आहे. हे प्रकरण राष्ट्रीय स्तराचे असून उत्तराखंड यामुळे सर्वाधिक पीडित असल्याचा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला आहे. तर सरकारकडून वणव्याच्या घटना आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या उपाययोजनांचा तपशील मांडण्यात आला.

स्थिती अत्यंत गंभीर

आतापर्यंत जंगलांमध्ये आगीच्या 398 घटनांची नोंद करण्यात आली आहे. 350 हून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले असून 62 जणांना आरोपी करण्यात आले आहे. 298 अज्ञात लोकांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. उत्तराखंडमधील स्थिती अत्यंत गंभीर आहे. जंगलांमधील प्राणी, पक्षी आणि वनसंपदेसोबत आसपास राहणाऱ्या रहिवाशांच्या अस्तित्वालाही भीषण धोका असल्याचे याचिकाकत्याने म्हटले आहे. तर याप्रकरणी केंद्रीय उच्चाधिकार समितीला सामील करू शकतो का असा प्रश्न न्यायाधीश गवई यांनी उपस्थित केला.

जंगलांमधील आगीचे संकट दूर करण्यासाठी राज्य सरकार काय करतेय अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली. आम्ही पाऊस आणि कृत्रिम पावसाच्या भरवशावर राहू शकत नाही. सरकारला पुढाकार घेत लवकरच प्रभावी उपाययोजना कराव्या लागतील असे न्यायाधीश संदीप मेहता यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारची बाजू

सध्या दोन महिन्यांच्या कालावधीत वणव्याच्या घटना घडत असतात. दर 4 वर्षांनी जंगलांमध्ये भीषण आगी लागतात. यानंतर पुढील वर्षी त्यांचे प्रमाण कमी होत जाते. चौथ्या वर्षी हे प्रमाण पुन्हा वाढते असे उत्तराखंड सरकारकडून सांगण्यात आले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 15 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

1145 हेक्टरचे जंगल खाक

उत्तराखंडमये नोव्हेंबरपासून आतापर्यंत 900 पेक्षा अधिक वणव्याच्या घटना घडल्या आहेत. मागील 6 महिन्यांमध्ये वणव्यांमुळे 1145 हेक्टरचे जंगल जळून गेले आहे. या वणव्यांमुळे आता शहरांवरही प्रभाव पडू लागला आहे. हे पाहता वायुदलाच्या हेलिकॉप्टरची वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत घेतील जात आहे.

Advertisement
Tags :

.