डासापासून उद्भवणाऱ्या आजारांचा फैलाव होणार नाही याची दक्षता घ्या
जिल्हास्तरीय विकास आढावा बैठकीत जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची सूचना
बेळगाव : पावसाळा सुरू होण्यापूर्वी डासापासून उत्पन्न होणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, यासारख्या आजारांचा फैलाव होणार नाही या दृष्टीने उपक्रम हाती घ्यावेत, अशी सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पंचायतराज खाते व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. जि. पं. कार्यालयात मंगळवारी झालेल्या जिल्हास्तरीय विकास आढावा बैठकीत शिंदे बोलत होते. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत बैठकीत विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
चिकोडी, गोकाक तालुक्यात मेगा आरोग्य मेळावा भरवणार
मधुमेह, रक्तदाब या आजारांवर ‘गृह आरोग्य’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये औषधांची व्यवस्था करण्यात आली असून, घरोघरी औषध वितरण करण्यात येत आहे. स्तन, तोंड गर्भाशयाच्या कॅन्सरवर रोग निदान गृहआरोग्य कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्यांमधून समुदाय आरोग्य केंद्रांमध्ये शस्त्रचिकित्सा विभाग व प्रसुती विभाग सुसज्जित व सुव्यवस्थित ठेवण्यात यावा अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केली. रायबाग येथील सरकारी दवाखान्यांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा विभाग सुरू करण्यात आला आहे. चिकोडी व गोकाक तालुक्यामध्ये मेगा आरोग्य मेळावा लवकरच भरविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
अशक्त, कमी वजनाच्या मुलांवर चिकित्सा
त्यानंतर सुदृढ आरोग्य-कुटुंब कल्याण सेवा विभागाच्या (बेंगळूर) डॉ. इंदिरा कवाडे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. अशक्त, कमी वजनाच्या मुलांवर चिकित्सा करण्यात येत आहे. पालकांनी याचा वेळीच लाभ घ्यावा. जि. पं. चे उपसचिव (विकास) बसवराज अडवीमठ, जिल्हा आरोग्य-कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. पी. आय. गडाद, अप्पर जिल्हा आरोग्य कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. एस. गडेद, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. चांदनी देवडी, जिल्हा कुष्टरोग नियंत्रण अधिकारी डॉ. गीता कांबळे, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी आदी बैठकीला उपस्थित होते.