महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गृहलक्ष्मींनो सांभाळा! बँक खात्यावर गुन्हेगारांचा डोळा!

11:47 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सायबर गुन्हेगारांकडून पोषण ट्रॅकर अॅप हॅक : लाभार्थ्यांच्या फोनवर फ्रॉड कॉल, बेळगाव शहरासह जिल्ह्यातही फसवणुकीचे प्रकार : सावध होण्याचे सरकारचे आवाहन

Advertisement

रमेश हिरेमठ/बेळगाव

Advertisement

सरकारी योजनेतील लाभार्थींचा डाटा आता खुल्या बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आपण दिलेली माहिती किती सुरक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सायबर गुन्हेगारांनी पोषण ट्रॅकर अॅपच्या माध्यमातून गर्भवती व प्रसूती झालेल्या महिलांना लक्ष्य बनविले आहे. आता गृहलक्ष्मी योजनेसाठीचा डाटा तरी सुरक्षित आहे का? असा प्रश्न आहे. सायबर गुन्हेगारांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सुरुवातीला एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगत ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम पळविण्यात येत होती. आता ही पद्धत पूर्णपणे कालबाह्या झाली आहे. आधारकार्डवरील फिंगरप्रिंटचा वापर करूनही सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांचे बँक खाते रिकामे करीत होते. आता सरकारी अॅपही सुरक्षित नाहीत, हे गेल्या आठ दिवसांतील घटनांवरून लक्षात येते.

गर्भवती महिलांना राज्य सरकारच्यावतीने पोषण अभियानांतर्गत 7,500 रुपये मिळतात. प्रसूतीनंतरही महिलांना सकस अन्न मिळावे, यासाठी राज्य सरकारकडून योजना राबविल्या जातात. या योजनेची जबाबदारी अंगणवाडी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. पोषण ट्रॅकर अॅपच्या माध्यमातून या योजनेतील लाभार्थ्यांवर नजर ठेवली जाते. त्यांना पौष्टिक आहार व रोख रक्कम उपलब्ध करून दिली जाते. कुपोषणामुळे गर्भवती महिलांचे हाल होऊ नयेत, प्रसूतीनंतरही त्यांची अवस्था बिकट होऊ नये म्हणून पोषण अभियानांतर्गत पौष्टिक अन्न देण्याचा उपक्रम आहे. आता पोषण ट्रॅकर अॅपच सायबर गुन्हेगारांनी हॅक केले आहे. या अॅपमध्ये गर्भवती व प्रसूती झालेल्या महिलांची संपूर्ण माहिती आहे. या माहितीचा वापर करीत गुन्हेगारांनी त्यांचे बँक खाते खाली करण्याचे काम सुरू केले आहे.

आठ दिवसात 10 ते 25 हजारपर्यंतची रक्कम हडप 

केवळ आठ दिवसात बेळगाव शहर व उपनगरात दहाहून अधिक गर्भवती महिलांच्या बँक खात्यातून 10 ते 25 हजारपर्यंतची रक्कम हडप करण्यात आली आहे. केवळ पोषण ट्रॅकर अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराची माहिती घेऊन महिलांना फोन कॉल केले जात आहेत. पोषण अभियानांतर्गत तुमच्या खात्यात 7,500 रुपये जमा करायचे आहेत. आम्ही पाठवतो त्या लिंकवर क्लिक करा. लगेच ओटीपी कळवा, तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगत गर्भवती महिलांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्यात येत आहे.

बेळगाव शहर व जिल्ह्यातही फसवणुकीचे प्रकार सुरू झाले आहेत. पोषण अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात गर्भवती व प्रसूती झालेल्या महिलांना मदत पुरविली जाते. जर पोषण ट्रॅकर अॅप पूर्ण प्रमाणात हॅक झाले असेल तर संपूर्ण राज्यातील महिलांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्यासाठी सायबर गुन्हेगार प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे साहजीकच पोलीस दलाचीही डोकेदुखी वाढली आहे.

प्रत्येक सरकारी योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. खासकरून सिद्धरामय्या सरकारने सुरू केलेल्या गृहलक्ष्मी या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी कर्नाटकातील लाखो महिलांनी आपली नावे नोंदविली आहेत. त्यांनी आपल्याविषयीची संपूर्ण माहिती सरकारला दिली आहे. त्यांच्या बँक खात्यात दरमहा 2 हजार रुपये जमा केले जातात. पोषण ट्रॅकर अॅपप्रमाणेच जर गृहलक्ष्मी योजना हाताळणारे अॅप हॅक झाले तर राज्यात हाहाकार माजणार आहे.

पोषण ट्रॅकर अॅप हॅक होऊ शकतो तर गृहलक्ष्मी योजनेची माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत का पोहोचू नये, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्राथमिक माहितीनुसार वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थींची माहिती सायबर गुन्हेगारांना विकली जात आहे. आधारकार्ड बनविताना प्रत्येकाचे फिंगरप्रिंट, डोळ्यांची प्रिंट घेतली जाते. आधारकार्डमधील बायोमेट्रिकचा वापर करून ईपीएसच्या माध्यमातून बँक खात्यातील रक्कम लूटण्याचे प्रकारही घडले आहेत. हे प्रकार आता कमी झाले असतानाच सायबर गुन्हेगारांनी सरकारी अॅपलाच खिंडार पाडले आहे.

सोशल मीडियावर यासंबंधी जागृती

ही सरकारी अॅप हॅक झाली आहेत की, पैशांच्या आमिषाने कोणी त्यांची विक्री केली आहे, याचा सुरुवातीलाच तपास यंत्रणेला शोध घ्यावा लागणार आहे. बेळगाव शहर व उपनगरात सुमारे 7 ते 8 प्रकार घडल्यानंतर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सोशल मीडियावर यासंबंधी जागृतीची पोस्ट केली आहे. ‘स्कॅम अलर्ट, वॉर्निंग पोषण ट्रॅकर अॅप’ असे एक पत्रक तयार करून सोशल मीडियावर जागृती केली जात आहे. शहर सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी या प्रकरणाचे मूळ शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. फसवणुकीचे प्रकार घडल्यानंतर लगेच सीईएन पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा किंवा 1930 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सोशल मीडियावर केले आहे. पोषण ट्रॅकर अॅपमधील माहितीच्या आधारे गर्भवती महिलांना लक्ष्य बनविल्याचे प्रकार पोलीस दलाने गांभीर्याने घेतले असून अॅपमधील माहितीची गळती कशी झाली? सायबर गुन्हेगारांनी ती हॅक केली की पैशांच्या आमिषाला बळी पडून कोणी त्याची विक्री केली आहे का? याचा तपास केला जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article