हिंडलगा कारागृहात कच्च्या कैद्यांचा युवकावर हल्ला
लक्ष्मण दड्डीवरील हल्ल्याचा बदला, जखमीला उपचारासाठी हुबळीला
बेळगाव : मुत्यानट्टी येथील लक्ष्मण दड्डीवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हिंडलगा कारागृहात एका युवकावर चार कैद्यांनी हल्ला केला आहे. जखमी कैद्यावर हुबळी येथील किम्समध्ये उपचार करण्यात येत असून वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कारागृहातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. हितेशकुमार चव्हाण, रा. रामतीर्थनगर असे जखमीचे नाव आहे. गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली असून यासंबंधी कारागृहाच्या मुख्य अधीक्षकांनी चौघा जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी होनगा औद्योगिक वसाहतीत मुत्यानट्टी येथील लक्ष्मण दड्डी (वय 55) याच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात परस्परांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते. हितेशकुमार हा मूळचा बिहारचा. होनगा औद्योगिक वसाहतीतील विनायक स्टील अँड रोलिंग या कारखान्यात तो व्यवस्थापक आहे.
हितेशकुमार व आयुब पठाण यांच्यात आर्थिक व्यवहारातून वादावादी झाली होती. या व्यवहारात मध्यस्थी करण्यासाठी मुत्यानट्टी येथील लक्ष्मण दड्डी कारखान्यात आला होता. यावेळी झालेल्या वादावादीनंतर तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. लक्ष्मण व त्याच्यासोबत आलेल्या दिलीप या दोघा जणांवर हल्ला करण्यात आला होता. लक्ष्मणला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी काकती पोलिसांनी कारखान्याचा व्यवस्थापक हितेशकुमार चव्हाणला 1 ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करून हितेशकुमारला सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास कारागृहात आणण्यात आले होते. तपासणीसाठी कारागृहातील इस्पितळाकडे नेताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
बसवराज होळ्याप्पा दड्डी, बसवाणी ऊर्फ बसू, सिद्धाप्पा नायक, सविना सिद्धाप्पा दड्डी, प्रधानी शेखर वाघमोडे या कच्च्या कैद्यांनी लक्ष्मण दड्डीवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी कारागृहात हितेशकुमारवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. कारागृहाचे मुख्य अधीक्षक बी. एम. कोट्रेश यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.