कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा
मारुतीनगर येथे मारुती मंदिराचे पावित्र्य धोक्यात
बेळगाव : मारुतीनगर, सांबरा रोड येथे मंदिर परिसरात वारंवार कचरा फेकण्याचे प्रकार घडत आहेत. स्थानिकांनी अनेकवेळा समज देऊनही परिसरातील अनेकजण मंदिराच्या बाजूला तसेच पाठीमागे कचरा फेकत आहेत. यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मारुतीनगर येथे मारुतीचे मंदिर आहे. या परिसरात मागील अनेक वर्षांपासून कचरा फेकला जातो. स्थानिकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्व कचरा उचलला. परंतु पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मंदिराच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
मंदिराच्या बाजूंने एकच रस्ता आहे. परंतु तेथेही ट्रक, टेंम्पो लावले जात असल्यामुळे कचरा उचल करणारे वाहन आतपर्यंत जाणे अशक्य होत आहे. त्यामुळे कचऱ्याची उचल कशी करायची, असा प्रश्न भाविकांसमोर आहे. तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.