वनजमीन बळकावणाऱ्यांवर कारवाई करा!
बेंगळूर : बोगस कागदपत्रे तयार करून वनजमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा. कायदेशीर कारवाई करून त्यांना शिक्षा होईल अशी पावले उचला, असे निर्देश वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. मौल्यवान वनजमीन बळकावण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, मंत्री ईश्वर खंड्रे यांनी शुक्रवारी त्यांच्या कार्यालयात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बेंगळूरच्या केंगेरीजवळील संरक्षित वनक्षेत्रातील सुमारे 25 हजार कोटी रुपये किमतीच्या 482 एकर क्षेत्र संरक्षणासाठी अपील दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एम. बी. नेमण्णगौडा यांनी 13 ऑगस्ट 2025 रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 17 दिवसांच्या आत म्हणजे 30 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याबद्दल मंत्री खंडे यांनी आश्चर्य व्यक्त केले. या निकालाला आव्हान देणारी याचिका तत्काळ दाखल करण्याची सूचना दिली.
वकिलांच्या भूमिकेबद्दल नाराजी
सरकारी पक्षाच्या वकिलाने या प्रकरणात शेवटच्या क्षणापर्यंत माहिती न दिल्याबद्दल मंत्री ईश्वर खंडे यांनी नाराजी व्यक्त केली. काही पात्र प्रकरणांमध्येही प्रकरण अपीलासाठी योग्य नाही असे मत व्यक्त करणाऱ्या सरकारी वकिलांबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.