बेंगळूर येथे अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा
एआयडीएसओ विद्यार्थी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : बेंगळूर येथे एका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात बुधवारी बेळगावमध्ये ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट ऑर्गनायझेशनच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. राज्यात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असून शैक्षणिक संस्थांमध्ये असे प्रकार घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. राणी चन्नम्मा चौक येथे एआयडीएसओ संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला. एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यासोबत तिला ब्लॅकमेल करून धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांपैकी दोन व्याख्याते आणि एक तिचा मित्र आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये जर असे प्रकार घडत असतील तर राज्यातील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न यावेळी विद्यार्थिनींनी उपस्थित केला. या घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी एआयडीएसओचे राजू गाणगी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.