बेकायदा झाडे तोडणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची मागणी
खानापूर : तालुक्यातील शिरोली येथील सर्व्हे क्र. 97 या शेतीसाठी जाणाऱ्या रस्त्यासाठी जंगलातील आणि स्वत:च्या मालकीतील बेसुमार झाडांची कत्तल करण्यात आली. तसेच जंगल हद्दीचे दगडही उखडून टाकून हद्द नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असताना खानापूर विभागाच्या वनाधिकारी सुनिता निंबरगी आणि लोंढा विभागाचे वनाधिकारी तेज वाय. पी. यांनी बेकायदा झाडे तोडणाऱ्यांना पाठीशी घालून ताब्यात घेतलेल्या जेसीबीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना वनखाते टोकाची भूमिका घेऊन नागरिकांना नमोहाराम करत आहे. त्यामुळे दुर्गम भागातील जनतेला जीवन जगणे असहय्य झाले आहे.
असे असताना बेकायदा झाडे तोडणाऱ्याच्या अॅट्रॉसिटीच्या धमकीला घाबरून अधिकारी कारवाईला कचरत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वनाधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आपण गप्प बसणार नसल्याचे माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. याबाबत माजी आमदार निंबाळकर पुढे म्हणाल्या, शिरोली भाग भीमगड अभयारण्यात येतो. येथील जंगल हे संरक्षित आणि इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये आहे. शेतीकडे जाण्यासाठी असलेले रस्तेही वनखात्याने बंद केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणेही कठीण झाले आहे.
शिरोली येथे सर्व्हेक्रमांक 97 ही जमीन घनदाट जंगलात असून या शेतीला जाण्यासाठी रस्ता नाही. असे असताना शेती मालकाच्या नातेवाईकांने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून सिसम आणि सागवानसारख्या झाडांची कत्तल करून आपल्या शेताला जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. हे सर्व विनापरवाना आणि बेकायदेशीर करण्यात आलेले आहे. याबाबत तेथील बिटगार्ड चलवादी यांनी याबाबतची माहिती लोंढा वनाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र लेंढा वनाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. सदर बाब विभागीय वनाधिकारी सुनिता निंबरगी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या ठिकाणी कारवाईचे आदेश देऊन जेसीबी आणि काही साहित्य ताब्यात घेतले होते.
ही झाडांची कत्तल 29 सप्टेंबर रोजी केली होती. आणि जेसीबीने रस्ता करून झाडांची परस्पर विल्हेवाट लावली होती. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी कारवाईचे नाटक करण्यात आले आहे. सिसम आणि सागवानी झाडे तोडण्याची परवानगी नसताना शेती मालकाच्या नातेवाईकाने आपल्या अधिकाराची दांडगाई दाखवत आणि अॅटासिटीची धमकी देत रस्ता केला आहे. या अधिकाऱ्याला पाठीशी घालून वनखाते बिटगार्ड चलवादी याच्यावर निलंबनाची कारवाई पेल्याचे दाखवून आपले हात झटकत आहेत. मात्र बिटगार्ड चलवादी यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. चोर सोडून सन्यासाला फाशी देण्यात येत आहे.
शेकडो वर्षांपासून तालुक्याच्या दुर्गम भागातील काही गावांना माझ्या आमदारकीच्या काळात मांगीनहाळ, आमगाव, जामगाव, देगाव, हुळंद या गावांच्या नकाशात नमूद असलेल्या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे नकाशात नमूद असलेले रस्ते वनखात्याने करू दिले नाहीत. त्यामुळे कोट्यावधीचा निधी वापस गेलेला आहे. आज मांगीनहाळ येथील जनतेचे रस्त्याअभावी हाल होत आहेत. आज वनखात्याच्या आडमुठे धोरणामुळे माण, आमगाव, जामगाव, देगाव, हेम्माडगा, सडा, हुळंद यासह इतर दुर्गम भागातील जनतेला हलाकीचे जीवन जगावे लागत आहे.
जर वनखात्याने थोडी माणुसकी दाखवली असती तर नकाशात नमूद असलेले रस्ते निश्चित पूर्ण झाले असते. मात्र वनखात्याच्या या आडमुठ्या धोरणामुळे विकास खुंटला आहे. जंगलातील शेतासाठी बेसुमार झाडांची कत्तल करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न खानापूर वनखाते करत आहे. मात्र याबाबत वनखाते आणि मुख्यमंत्र्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा कङन वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू, असे त्यांनी सांगितले.