जमीन हडप करणाऱ्यांवर कारवाई करा
राज्य शेतकरी संघटनेची मागणी : राणी चन्नम्मा सर्कलमध्ये तीव्र निदर्शने
बेळगाव : कित्तूर येथील इनामदाराने कुळ्ळोळीमधील शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून ते रस्त्यावर आले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत असलेली हजारो एकर जमीन इनामदाराकडून हडपण्यात आली असून सदर जमिनी आपल्याच असल्याचे ते सांगत आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पावले उचलली होती. पण उलट इनामदाराने त्यांच्यावरच उच्च न्यायालयाकडून एफआयआर दाखल केला. यामुळे आमच्यावर अन्याय होत असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कडक करवाई करावी, अशी मागणी राज्य शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले. प्रारंभी कन्नड साहित्य भवनपासून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यानंतर राणी चन्नम्मा सर्कलमध्ये मानवी साखळी करून अर्धा तास आंदोलन करण्यात आले.
यामुळे मोठा ट्रॅफिक जाम झाला होता. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान जिल्ह्याचा न्यायनिवाडा करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधातच अशाप्रकारचे कृत्य होत राहिले तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांची अवस्था यापेक्षा वाईट आहे. सदर जमिनी वडिलोपार्जीत असून शेतकऱ्यांची उपजीविका यावरच चालते. जर जमिनी गेल्या तर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असून यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. सरकारकडून अनेक पाण्याच्या योजना याठिकाणी पुरविण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांची आधारकार्ड, मतदार ओळखपत्र आदी कागदपत्रे याठिकाणाची आहेत. यामुळे एक गुंठा जमीनदेखील इनामदारांची नसून ही घटना प्रजाभुत्वाच्या विरोधी आहे. यामुळे नागरिक व शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घ्यावी. तसेच संबंधितांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. जर असे झाले नाही तर शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येऊन संबधितांच्या घरावर हलगी मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला.