शेपटीवाले दोस्त
प्रत्येक माणसाला आयुष्यात विश्वासू आणि प्रेमळ सोबत हवी असते. आपल्या आजूबाजूला आपल्यावर जीव लावणारे कोणीतरी असले की किती समाधान वाटते ना! असे म्हणतात की माणूस सर्वश्रे÷ प्राणी असल्याचे एक कारण म्हणजे त्याला देवाने दिलेले बोलण्याचे वरदान! या वरदानामुळे तो आपल्या माणसांशी मोकळेपणाने संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करू शकतो आणि काही हवं नको ते सांगू शकतो.
पण, इतर प्राण्यांची भाषा आपल्याला कळू शकत नाही. तरीसुद्धा ते जगात आपले स्थान टिकवून आहेत. निसर्गात आज प्रत्येक प्राण्याचे वेगळे स्थान आहे. काही प्राणी असे आहेत जे माणूस जमातीपासून लांब जंगलात राहतात तर काही पाळीव प्राणी असतात. त्यातील कुत्रा हा केवळ एक पाळीव प्राणी नसून त्यात माणसाचा नि÷ावंत सोबती होण्याची क्षमता आहे. काही न बोलता, काही न मागता तो इमानदारीने त्याच्या घराचे आणि त्यातील सदस्यांचे रक्षण करतो. हे प्रेम असल्याशिवाय का? म्हणूनच कुत्र्यांना माणसाचा सगळय़ात चांगला मित्र म्हटले गेले आहे. कुत्रा काय, आवडीचा कोणताही पाळीव प्राणी घरात असला की घरात सर्वत्र आनंदच पसरलेला दिसेल. घरात पाळीव प्राणी असल्याने माणसाचे मानसिक आरोग्य निरोगी राहते, त्याच्या मनावरचा ताण कमी होतो हे वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झाले
आहे.
भारतीय राज्यघटनेने कलम 51 (जी) अन्वये सर्व प्राण्यांमधील सहअस्तित्वाचे समर्थन केले आहे. यानुसार प्रत्येक नागरिकाला हवे तसे जगायचा अधिकार दिला आहे. त्यामध्ये माणसाने सोबती म्हणून प्राण्याबरोबर किंवा त्याशिवाय राहण्याच्या निवडीचादेखील समावेश आहे. पण कित्येकदा आपण पाळीव प्राण्यांवर होणारे अत्याचार, दुर्लक्ष आणि गैरव्यवहार बघतो. अशावेळेला या मुक्मया प्राण्यांना योग्य ती मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपण भारतीय संविधानात उल्लेखलेले पाळीव प्राण्यांसाठीचे नियम आणि कायदे जाणून घेणे आवश्यक आहे.
1. पाळीव कुत्र्यांना इमारतीत परवानगी देणे
बऱयाच हौसिंग सोसायटींमध्ये ‘पाळीव प्राण्यांवर बंदी’ चा नियम असतो. सर्व नियमांचे पालन करूनसुद्धा, केवळ घरामध्ये पाळीव प्राणी पाळण्याला लोकांचा विरोध असतो. पण, कायद्यानुसार कोणतीही समिती किंवा सोसायटी, रहिवाशाला पाळीव प्राणी ठेवण्यापासून थांबवू शकत नाही. कुत्रं-मांजरीच्या जातीवर किंवा आकारावर बंधन घालू शकत नाही. प्रत्येक रहिवाशाला त्यांच्या इच्छेनुसार पाळीव प्राणी घरात ठेवण्याचा अधिकार आहे. जर त्या घरातील प्राण्याची नोंद महापालिकेत केली असूनही इतर रहिवासी त्यावर आक्षेप घेत असतील, तर तो माणूस त्यांच्यावर उलटी कायदेशीर कारवाई करू शकतो.
2. कुत्र्यांचे भुंकणे
कोणत्याही सोसायटीमध्ये राहणाऱया पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यावरून इतर रहिवासी त्याच्या मालकावर कारवाई करू शकत नाहीत. कुत्री भुंकतात म्हणून कुत्री पाळण्यापासून बंदी घालणे हे कायदेशीररित्या चुकीचे आहे. अशावेळेला एकमेकांमध्ये सामंजस्याची भावना निर्माण करून आपण एकमेकांशी सलोख्याने राहायला हवे. पाळीव प्राण्यांच्या मालकाने ही दक्षता घेतली पाहिजे की आपल्या घरातील प्राण्यांमुळे इतरांना त्रास होणार नाही, तर इतर रहिवाशांनी त्यांच्या प्राणी पाळण्याच्या निर्णयाचा मान ठेवला पाहिजे.
3. पाळीव प्राणी आणि लिफ्ट
कायद्यानुसार, अपार्टमेंटमधील समिती लिफ्ट किंवा लिफ्ट वापरणाऱया पाळीव प्राण्यांविरूद्ध कोणतेही कायदे करू शकत नाहीत किंवा भाडेकरूंना दंड आकारू शकत नाही. आजच्या काळात बरेच जण मोठमोठय़ा इमारतींमध्ये राहतात ज्यात 15-20 मजले असतात. अशा वेळेला प्राण्यांना लिफ्ट वापरू न देणे हे चुकीचे आहे. त्यांचे मालक एक दक्षता घेऊ शकतात की त्यांचे प्राणी लिफ्ट घाण करणार नाहीत व त्यातील लोकांना त्रास देणार नाहीत. पण या व्यतिरिक्त पाळीव प्राण्यांनी लिफ्ट वापरल्याबद्दल मालकावर दंड आकारणे हा कायद्याने गुन्हा आहे.
4. पाळीव प्राणी आणि सार्वजनिक स्थळ
उद्याने, मैदाने अशा गोष्टी करमणुकीसाठीच असतात. आपल्या सभोवतालच्या उद्यानांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. तेथे येणाऱया प्रत्येक माणसाने त्या जागेचा वापर जपून केला पाहिजे. हा नियम माणसाला त्यांच्या पाळीव प्राण्यांइतकाच लागू पडतो. कायद्यानुसार, प्राण्यांना सोसायटीच्या उद्याने आणि बागांमध्ये प्रवेश करण्यापासून बंदी घालण्याची परवानगी नाही. पण, असुविधा टाळण्यासाठी, काही प्रतिबंधात्मक नियम आपापसात ठरवून त्यांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. जसे की पाळीव कुत्र्यांना बागेत मोकळे न सोडणे, मुलांच्या जवळ न जाऊ देणे, त्यांची घाण काढून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे इत्यादी.
5. पाळीव प्राणी आणि त्यांची जबाबदारी
घरातील सदस्याने आपल्या पाळीव प्राण्यांना निरोगी आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नित्यकर्माचे पालन केले पाहिजे. प्रत्येक पाळीव प्राण्याला सर्व औषधे व लसी वेळेवर दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर प्राण्यांनी केलेली घाण काढणे ही सर्वस्वी त्या प्राण्यांना घेऊन आलेल्या माणसांची जबाबदारी आहे. प्राण्यांबद्दलची कोणतीही क्रूरता हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 आणि भारतीय दंडसंहितेच्या कलम 428 आणि 429 अंतर्गत दंडनीय गुन्हा देखील आहे.
या सगळय़ा पलीकडे, माणसाने फक्त एकाच गोष्टीचे अनुसरण केले पाहिजे, आणि ते म्हणजे सामंजस्य. माणूस स्वतःच्या गरजेसाठी किंवा स्वार्थासाठी घरात पाळीव प्राणी आणतो, पण ते त्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग कधी होतात हे कळतच नाही. अशावेळेला घरातील प्रत्येक जीवाची काळजी घेण्याची जबादारी त्यातील सदस्यांचीच असते. माणसासारख्याच इतर प्राण्यांनादेखील भावना आहेत. त्या व्यक्त करण्याची साधने फक्त त्या प्राण्यांकडे माफक आहेत. एवढे असूनही, हे प्राणी आपल्यावर जीव झोकून द्यायला सक्षम आहेत. माणूस आज स्वतःला इतर पशु पक्ष्यांपेक्षा श्रे÷ समजू लागला आहे. तो हे विसरतो की तोही या अमर्याद निसर्गाचा एक छोटासा भाग आहे. माणूस आणि इतर प्राण्यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. पण माणसासह प्रत्येक प्राण्याचे निसर्गात एक अद्वितीय स्थान आहे. म्हणूनच, पाळीव प्राण्यांना अडचण म्हणून बघण्यापेक्षा सोबती म्हणून वागवले गेले पाहिजे कारण निसर्गाशिवाय माणूस नाही आणि प्राण्यांशिवाय निसर्ग नाही!
-श्राव्या माधव कुलकर्णी