काँग्रेसचे डावपेच...निजदसमोर पेच
राज्यात हावेरीतील शिग्गाव, बळ्ळारीतील संडूर व मंड्यातील चन्नपट्टण विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत असून यासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया रंगली आहे. त्यातच भाजपमधील सी. पी. योगेश्वर यांनी पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये सामील होत भाजप-निजद युतीला धक्का दिला आहे. काँग्रेसच्या डावपेचांना यश आले असून आता निजद हा झालेला पेच कसा सोडवतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. एकूणच पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाचे राजकारण सध्याला चांगलेच तापल्याचे दिसून येते आहे.
हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव, बळ्ळारी जिल्ह्यातील संडूर व मंड्या जिल्ह्यातील चन्नपट्टण विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाचे राजकारण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या खेळीमुळे भाजप-निजद युतीला धक्का बसला आहे. चन्नपट्टणमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत ते खासदार झाले. त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळाले. त्यामुळे ती जागा निजदला मिळणार, अशी अपेक्षा होती. या जागेवर माजी मंत्री सी. पी. योगेश्वर डोळा ठेवून होते. आपल्याला भाजपची उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एका रात्रीत पक्षांतराचे पर्व घडल्याचे भासवण्यात येत असले तरी गेल्या सहा महिन्यांपासून यासाठी काँग्रेसने तयारी केली होती, हे लपून राहिले नाही. म्हणून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार चन्नपट्टणमध्ये आपणच उमेदवार असणार, असे सुरुवातीपासून सांगत आले होते.
काँग्रेसने चन्नपट्टणची उमेदवारी योगेश्वर यांना जाहीर केली आहे. निजदने योगेश्वर यांना एक पर्याय सुचवला होता. भाजप-निजद युतीच्या सत्तावाटपात चन्नपट्टणची जागा निजदच्या वाट्याला येते. त्यामुळे निजदमध्ये प्रवेश करून आमच्या चिन्हावरच निवडणूक लढवलात तर आपली हरकत राहणार नाही, असा पर्याय त्यांनी सुचवला होता. आयुष्यभर ज्या निजद नेत्यांचा आपल्याला विरोध होता, आपण ज्यांच्या विरोधात होतो, त्याच पक्षाच्या चिन्हावर आपण निवडणूक लढवणार नाही. हवे तर भाजपमधून उमेदवारी द्या, अशी मागणी योगेश्वर यांनी केली होती. ते कुमारस्वामी यांना मान्य नव्हते. चन्नपट्टणची जागा एकदा जर आपण भाजपसाठी सोडून दिली तर पुढे पुन्हा निजदला चन्नपट्टण मिळविणे कठीण होणार आहे, याची भीती कुमारस्वामी यांना वाटत होती. त्यामुळेच त्यांनी निजदमधून निवडणूक लढविण्याचा पर्याय सुचवला होता.
खरेतर सुरुवातीपासूनच आपले चिरंजीव निखिल कुमारस्वामी यांच्यासाठी चन्नपट्टणमधून कुमारस्वामी कुटुंबीयांनी वातावरण निर्मिती सुरू केली होती. अधूनमधून चन्नपट्टणचा उमेदवार आपणच, असे वक्तव्य करणाऱ्या सी. पी. योगेश्वर यांच्यामुळे भाजप-निजद युतीमधील संबंध ताणत चालले होते. भाजपच्या हायकमांडने तर चन्नपट्टणाचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, असे सांगत कुमारस्वामी यांना फ्रि हँड दिला होता. त्यामुळेच ते निर्धाराने आपल्या मुलासाठी आखाडा तयार करण्याच्या कामाला लागले होते. निजदची पकड ढिली करण्यासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी. के. सुरेश हे गेल्या तीन महिन्यांपासून कार्यरत आहेत. या दोन्ही नेत्यांचे दौरे वाढले होते. कनकपूरमधून लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले डी. के. सुरेश यांना चन्नपट्टणमधून उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करणार, अशी अटकळ होती. या मतदारसंघासाठी शिवकुमार यांनी सुरुवातीपासूनच गौप्यता पाळली होती. कोणीही विचारले तर चन्नपट्टणचा उमेदवार आपणच आहोत, असे ते सांगत होते. शेवटी निजदला धक्का देण्यासाठी त्यांनी सी. पी. योगेश्वर यांना काँग्रेसमध्ये घेतले आहे.
या पक्षांतरामागे डी. के. शिवकुमार यांची दूरदृष्टी दडलेली आहे. 2028 च्या निवडणुकीत या मतदारसंघात निजदचे अस्तित्व संपविण्यासाठी त्यांनी योगेश्वर यांचा वापर सुरू केला आहे. कारण कुमारस्वामी आणि शिवकुमार या दोन बलाढ्या वक्कलिग नेत्यांमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात एकमेकांना संपवण्यासाठी शह-काटशहाचे राजकारण केले जात आहे. सी. पी. योगेश्वर यांनी लगेच उमेदवारी अर्जही दाखल केला. आता या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची? असा प्रश्न निजदसमोर पडला आहे. निजदचे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी निखिल कुमारस्वामी यांना रिंगणात उतरवण्याचा सल्ला दिला आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ खासदार मंजुनाथ यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मैत्री धर्म पाळण्यासाठी आपण चन्नपट्टणमधून उमेदवारी देणार नाही. निजदचा उमेदवारच युतीचा उमेदवार असणार, असे भाजप नेते सांगत असले तरी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसवासी झालेले सी. पी. योगेश्वर यांना पक्षाला आवर घालता आला नाही. योगेश्वर यांची चन्नपट्टण मतदारसंघावर पकड आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्यांना गेल्या काही महिन्यांपासून गळ घातली होती. शेवटी त्यांनी टाकलेल्या गळाला योगेश्वर लागले आहेत. डि. के. यांची खेळी येथे यशस्वी ठरली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश यांच्या पराभवासाठी सी. पी. योगेश्वर कारणीभूत आहेत. योगेश्वर यांच्यामुळे डी. के. बंधूंची घोडदौड रोखली गेली. तरीही देवेगौडा कुटुबीयांच्या बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी शिवकुमार यांनी योगेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने जर उमेदवारी दिली असती तर आपण काँग्रेसमध्ये यायचा प्रश्नच येत नव्हता, असे सांगत योगेश्वर यांनी पोटनिवडणुकीत चन्नपट्टणमधून काँग्रेसचा झेंडा फडकणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. आतापर्यंत चार ते पाच वेळा पक्षांतर करणाऱ्या योगेश्वर यांच्या अंगात काँग्रेसचे रक्त वाहते आहे. अपरिहार्य राजकीय परिस्थितीमुळे ते भाजपमध्ये होते. आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत विजय आपलाच आहे, असे डी. के. शिवकुमार यांनी जाहीर केले आहे.
चन्नपट्टणमध्ये योगेश्वर विजयी झाले तर पक्षात त्यांचा दबदबा वाढणार आहे. प्रत्यक्षात तीन मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका होत असल्या तरी सध्या चन्नपट्टणच ठळक चर्चेत आले आहे. भाजपला मात्र संडूर आणि शिग्गावमधूनही अंतर्गत बंडाळीला सामोरे जावे लागत आहे. शिग्गावमध्ये माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी वाढली आहे. संडूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. सी. पी. योगेश्वर यांच्या पक्षांतरामुळे भाजपची बदनामी टळली आहे. कारण ते पक्षात असले तरी युतीचा प्रचार केले नसते. त्यामुळे भाजपनेच त्यांना फूस दिल्यामुळे युतीच्या उमेदवाराविरुद्ध ते कार्यरत आहेत, असा अर्थ काढला असता. भाजपने मात्र युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचे ठरवले आहे. भाजप-निजद युती व काँग्रेस या तिन्ही पक्षांना पोटनिवडणूक म्हणजे एक अग्निपरीक्षा ठरली आहे. केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना चन्नपट्टणमध्ये विजय मिळविणे अनिवार्य आहे. कारण, दक्षिणेत त्यांच्या कुटुंबांचा व पक्षाचा दरारा, दबदबा कायम ठेवण्यासाठी वक्कलिग समाजाचे मतदार बहुसंख्य असलेल्या मतदारसंघावर पकड ठेवणे गरजेचे आहे. डी. के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी. के. सुरेश हे त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांना आडकाठी घालत आहे. आता सी. पी. योगेश्वर यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसची ताकद वाढली आहे. निवडणूक निकालावरून तीन राजकीय पक्ष व दोन कुटुंबांचे अस्तित्व ठरणार आहे.