टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा उद्यापासून
यजमान अमेरिका-लढतीने स्पर्धेस प्रारंभ, भारताची सलामीची लढत 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
विश्वचषक टी-20 स्पर्धा अमेरिकेत आजपासून व भारतीय वेळेनुसार उद्यापासून सुरू होत असून त्यात नेहमीचे आवडते बलवान संघ, चोकर्स आणि ताकद कमी असलेले, पण धक्का देऊ शकणारे संघ असे नेहमी विश्वचषकात दिसणारे चित्र दिसेल. यानिमित्ताने टी-20 क्रिकेट अमेरिकन बाजारपेठेत धडाका लावण्यास सिद्ध झाले आहे.
भारत नजीकच्या काळांत घडलेल्या चुकांचे सावट दूर करून नवीन इतिहास लिहिण्यास उत्सुक असेल, तर ऑस्ट्रेलिया त्यांच्या वर्चस्वाला आणखी एक अध्याय जोडण्यास इच्छुक असेल. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजसारख्यांसाठी सर्वांत अयोग्य वेळी उसळी घेण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे हे प्राथमिक लक्ष्य असेल. गतविजेते इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेवरही लक्ष असेल. विशेषत: दक्षिण आफ्रिकेला भक्कम दावेदार मानले जाईल. कारण हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, क्विंटन डी कॉक आणि कागिसो रबाडा यासारख्या मॅच-विनर्सची उपस्थिती त्या संघात असून दक्षिण आफ्रिका संघ चोकर्सच्या टॅगपासून मुक्त होण्यास सज्ज असेल.
29 दिवसांमध्ये खेळल्या जाण्राया 55 पैकी 16 सामन्यांचे यजमानपद भूषविणाऱ्या अमेरिकेमध्ये क्रिकेटच्या प्रवेशाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची घटना असेल. 29 जून रोजी सुपर 8 टप्पा, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासह उर्वरित 39 सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. अफगाणिस्तानचा संघ देखील यावेळी लक्ष वेधून जाईल. कारण अनपेक्षित धक्के देण्याची ताकद त्यांच्यात लपलेली आहे. पुढील एक महिन्याच्या कालावधीत ही स्पर्धा आकार घेत जाईल तशा अनेक उत्कंठावर्धक गोष्टी समोर येतील.
पण सर्वांत लक्षवेधी भारतीय संघ असून तो ‘आयसीसी ट्रॉफी’ मिळविण्याच्या नजीक पोहोचूनही त्यापासून दूर राहिला आहे. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर त्यांना आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. यावेळी कर्णधार म्हणून रोहित शर्माची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. संघामध्ये असलेली अतुलनीय संसाधने आणि खोली लक्षात घेता बहुतेक तज्ञांना गेल्या दशकभरात भारताच्या वाट्याला आलेल्या आयसीसी ट्रॉफीच्या दुष्काळाची ठोस कारणे देणे जड जाते. रोहितच्या आधी कर्णधारपद सांभाळलेल्या विराट कोहलीचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून कार्यकाळ संपला, पण आयसीसी स्पर्धेचा चषक काही त्याच्या हाताला लागला नाही.
रोहितनेलाही विश्वविजेतेपदाने सतत हुलकावणी दिलेली असून भारताला गेल्या 12 महिन्यांत दोन आयसीसी स्पर्धांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेले आहे. यात घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचाही समावेश होतो. मागील दोन टी-20 विश्वचषकातील त्यांचा कालबाह्य दृष्टिकोन त्यांना महागात पडला होता. परंतु अमेरिकेत त्या चुकांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. नुकत्याच संपलेल्या आयपीएलने दाखवले आहे की, फलंदाज कसे त्यांच्या सीमा विस्तारत चालले आहेत आणि भारताच्या हाय-प्रोफाइल लाइनअपने तो धोकादायक मार्ग अवलंबण्याची गरज आहे.
काही प्रतिस्पर्धी संघांच्या तुलनेत भारताकडे फलंदाजीची स्फोटक ताकद नसली, तरी कॅरिबियनमधील खेळपट्ट्dया फिरकीला अनुकूल ठरण्याची अपेक्षा केली जात आहे. ते त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. रोहितचा संघ 9 जून रोजी पाकिस्तानविऊद्धच्या ब्लॉकबस्टर लढतीसह येथील तात्पुरत्या सुविधांवर तीन सामने खेळणार आहे. सर्व संघांसाठी हा अपरिचित प्रदेश असून नवीन सुविधेवर ड्रॉप-इन खेळपट्ट्या वापरल्या जाणार आहेत. भारताला मात्र आज 1 जून रोजी बांगलादेशविऊद्धचा सराव सामना खेळण्याचा फायदा होईल. 5 जून रोजी ते आयर्लंडविऊद्धचा पहिला साखळी सामना खेळतील.
अमेरिका व कॅनडामध्ये 1844 साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळविला गेला होता. आता ते स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पुन्हा भिडतील. यानिमित्ताने अमेरिका संघाचे टी-20 विश्वचषकात पदार्पण होणार असून कॅनडाचा संघ जरी एकदिवसीय विश्वचषकात खेळलेला असला, तरी प्रथमच टी-20 विश्वचषकात झळकणार आहे.