सीरियन राष्ट्राध्यक्षांना रशियाकडून आश्रय
सीरियातील परिस्थितीवर भारताचे लक्ष : बंडखोर गटाकडून सत्तेसाठी हालचाली
वृत्तसंस्था/ दमास्कस
बंडखोरांनी सीरिया ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद हे देश सोडून रशियात पळून गेले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी असद आणि त्यांच्या कुटुंबीयांना राजकीय आश्रय दिला आहे. दुसरीकडे, अमेरिकेने सीरियात असद सरकार पडल्याचे स्वागत केले आहे. तर भारताने आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि आपले सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात ‘सीरियाच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण केले जावे. जनतेचे हित लक्षात घेऊन राजकीय प्रक्रिया शांततेने पार पाडली पाहिजे’ असे म्हटले आहे.
रशियन प्रेसिडेंशियल पॅलेसचे प्रवत्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सीरियन राष्ट्राध्यक्षांच्या आश्रयाबाबत माहिती दिली आहे. सीरियाच्या अध्यक्षांना आश्रय देणे हा पुतिन यांचा वैयक्तिक निर्णय होता, असे म्हटले आहे. मात्र, असद यांना कोठे ठेवले आहे याची माहिती देणार नसल्याचेही सांगितले. दरम्यान, बंडखोरांनी असद यांना पदच्युत करणार असल्याची माहिती तुर्कस्तानला सहा महिने आधीच दिल्याची बाबही पुढे आली आहे.
दुसरीकडे, असद सरकारचा मित्रपक्ष असलेल्या इराणने सीरियातील सत्तापालटाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. सीरियन सैन्य बंडखोरांना रोखू शकत नसल्याबद्दल इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद यांनी इराणकडे कोणतीही मदत मागितली नसल्याचेही अराघची यांनी सांगितले.
इस्रायली सैन्याची सीरियात घुसखोरी
असद सरकारच्या पतनानंतर इस्रायलने 50 वर्षांत प्रथमच सीरियाची सीमा ओलांडली आहे. तेथील गोलान हाईट्स भागात आपले सैन्य पाठवले आहे. यापूर्वी 1973 मध्ये इस्रायली सैन्याने सीरियात प्रवेश केला होता. इस्रायली सैन्याने प्रवेश केलेला सीरियातील भूभाग एक निशस्त्राrकरण क्षेत्र आहे. सीरियाचे सैन्य येथून पळून गेले आहे. इस्रायली सैन्याने सीरियाच्या बाजूच्या माऊंट हर्मोन परिसरासह सामरिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. 1967 च्या सहा दिवसांच्या युद्धात इस्रायलने सीरियाच्या गोलान हाईट्सवर कब्जा केला होता. इस्रायलची सीरियाशी 83 किमी लांबीची सीमा आहे.
बंडखोरांचा सीरियातील कायदा-सुव्यवस्थेवर ताबा
बशर अल-असदने देश सोडल्यानंतर लोकांनी त्याच्या राजवाड्यात घुसून तोडफोड सुरू केली. संपूर्ण दमास्कस शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडली होती. आता बंडखोर ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. बंडखोर गटांनी आपले सैनिक सरकारी इमारतींच्या बाहेर तैनात केले आहेत. लढवय्ये वाहतूक व्यवस्थाही सांभाळत आहेत.
रासायनिक अस्त्रांचा गैरवापर होण्याची भीती
सीरियातील अशांतता असताना इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडोन यांनी तेथील रासायनिक शस्त्रांबाबत चिंता व्यक्त केली आहे. ही शस्त्रs कट्टरपंथीयांच्या हाती पडल्यास त्यांचा गैरवापर होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. किंबहुना, सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या राजवटीत रासायनिक अस्त्रांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या अस्त्रांचा वापर असद यांनी बंडखोरांविरुद्ध केला होता.