सीरियन राष्ट्राध्यक्षांचे देशातून पलायन
बंडखोर गट ‘एचटीएस’चा राष्ट्रपती भवनावर ताबा :
वृत्तसंस्था/ दमास्कस
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेले आहेत. तसेच त्यांनी राजीनामा दिल्याची पुष्टी लष्कराने केली असून राष्ट्राध्यक्षांची सत्ता संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या 11 दिवसांपासून बंडखोर गट आणि लष्कर यांच्यात सीरियामध्ये कब्जा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू होता. बंडखोर सैनिकांनी रविवारी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. असद यांनी देश सोडल्यानंतर सीरियाच्या पंतप्रधानांनी बंडखोरांच्या हाती सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी एक व्हिडीओ जारी केला असून त्यामध्ये आपण देशातच राहणार असून सीरियातील लोक ज्याला निवडतील त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
गेल्या एका आठवड्यात बंडखोरांनी राजधानी दमास्कसशिवाय सीरियातील चार प्रमुख शहरांवर कब्जा केला आहे. यामध्ये अलेप्पो, हमा, होम्स आणि दारा यांचा समावेश आहे. बंडखोरांनी 6 डिसेंबर रोजी ताब्यात घेतलेल्या दारा शहरातून राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला. दारा येथे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्याविरोधात बंडखोरी सुरू झाल्यापासून आता देशभरात युद्ध सुरू झाले. दारा ते राजधानी दमास्कसचे अंतर सुमारे 100 किमी आहे. स्थानिक बंडखोरांनी येथे कब्जा केला आहे.
इस्लामी गट हयात तहरीर अल-शामच्या (एचटीएस) बंडखोरांनी रविवारी सीरियामध्ये महत्त्वपूर्ण विजय घोषित केला आणि होम्स या सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण शहरावर कब्जा केल्याचा दावा केला. यासोबतच असद यांना सत्तेवरून हटवल्यानंतर सीरियातील असद कुटुंबाची 54 वर्षांची प्रदीर्घ राजवट संपुष्टात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
अलेप्पो, हमा आणि होम्स ही शहरे इस्लामिक अतिरेकी गट हयात तहरीर अल-शामच्या ताब्यात आहेत. येथील संघर्षामुळे आतापर्यंत 3.70 लाख लोक विस्थापित झाले आहेत. बंडखोर लोक असद सरकार पडल्याचा आनंद साजरा करत आहेत. लष्कराच्या रणगाड्यांवर चढून आनंद साजरा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राजवाड्यातील साहित्य लुटले
आठवडाभर चाललेल्या संघर्षानंतर अखेर रविवार, 8 डिसेंबरला सीरियाच्या बंडखोर सैन्याने राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. यादरम्यान सरकारी जवानांकडून कोणताही प्रतिकार झालेला नाही. यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर सीरियाच्या लोकांनी दमास्कसमधील राष्ट्रपती भवनात घुसून असद राजवाड्यातील सामानाची लूट केली. सीरियातील गृहयुद्धादरम्यान बंडखोरांनी अनेक मोठ्या शहरांवर कब्जा केल्याचे सांगितले जात आहे. असद पॅलेसचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये मोठ्या संख्येने लोक राष्ट्रपतींच्या राजवाड्यात घुसल्याचे दिसत आहे. तसेच साहित्य आणि कपडे बाहेर नेतानाही दिसून येत आहेत. या आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने दिसत आहेत.
असद यांनी 11 दिवसात गमावली सत्ता
लष्कर आणि सीरियन बंडखोर गट हयात तहरीर अल शाम यांच्यात 2020 च्या युद्धविरामानंतर 27 नोव्हेंबर रोजी सीरियामध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला. यानंतर 1 डिसेंबर रोजी बंडखोरांनी सीरियातील दुसरे सर्वात मोठे शहर अलेप्पोवर ताबा मिळवला. सीरियन युद्धादरम्यान 4 वर्षांच्या लढाईनंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी ते जिंकले होते. अलेप्पो जिंकल्यानंतर चार दिवसांनी, बंडखोर गटांनी आणखी एक मोठे शहर, हमा आणि नंतर दक्षिणेकडील दारा शहर ताब्यात घेतले. यानंतर राजधानी दमास्कसला दोन दिशांनी वेढा घातला आहे. अशाप्रकारे असद यांनी अवघ्या 11 दिवसांत आपली सत्ता गमावली आणि सीरियावरील असद कुटुंबाची 50 वर्षांची सत्ता संपुष्टात आली.
सीरियातील संघर्षाचा घटनाक्रम...
27 नोव्हेंबर - लष्कर आणि बंडखोर यांच्यातील संघर्षाला सुरुवात
1 डिसेंबर - अलेप्पो शहर बंडखोर गट ‘एचटीएस’ने ताब्यात घेतले
5 डिसेंबर - ‘एचटीएस’ बंडखोरांनी हमा शहरही काबीज केले
6 डिसेंबर - दारा शहरावर स्थानिक बंडखोर गटाने मिळविला ताबा
7 डिसेंबर - ‘एचटीएस’ सैनिकांनी होम्स विभागही ताब्यात घेतला
8 डिसेंबर - बंडखोरांचा दमास्कसमध्ये प्रवेश, राष्ट्राध्यक्षांचे पलायन
लष्करी रणगाड्यांवर स्वार होत आनंदोत्सव