प्रेमाचे प्रतीक ‘विवाहित खडक’
पवित्र मानून जोडपी करतात त्याच्यासमोर विवाह
द वेडेड रॉक्स किंवा मेओटो इवा जपानमधील दोन पवित्र खडक असून त्यांना ‘पती आणि पत्नी खडक’ किंवा ‘विवाहित खडक’ देखील म्हटले जाते. हे खडक पुरुष आणि महिलेमधील प्रेम तसेच सुखद गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानले जातात. जोडप्यांकडून या खडकांना पवित्र पाहून त्यांच्यासमोर विवाह केला जातो.
हे दोन्ही खडक जपानमधील फुटामी शहरानजीक समुद्रात आहेत. मोठा खडक सुमारे 40 मीटर व्यासासोबत 9 मीटर उंच आहे. त्याचे नाव इजानगी आहे आणि तो पतीचे प्रतीक आहे. याच्या शिखरावर एक छोटेस शिंटो टोरी गेट आहे. या खडकाच्या उजव्या बाजूला 3.6 मीटर उंच खडक असून त्याचे नाव इजानामी आहे. हा खडक जवळपास 9 मीटर गोल असून तो एका पत्नीच्या रुपात प्रतिनिधित्व करतो.
विवाहित असल्याने दोन्ही खडक शिमेनावा दोरखंडाने जोडले गेलेले आहेत. हे अध्यात्मिक आणि संसारिक क्षेत्रांदरम्यान विभाजनाचे प्रतीक आहेत. हा दोरखंड शिमेनावा प्रकारचा असून त्याचे वजन एक टन असते. वर्षात तीनवेळा मे, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये आयोजित एका विशेष समारंभात हा दोरखंड बदलण्यात येत असतो.
खडकांसमोर करतात विवाह
मेओटो इवाला आज विवाहासाठी एक तीर्थस्थळ मानले जाते. लोक या खडकांना पवित्र मानून याच्या समोर परस्परांचा हात पकडतात आणि कायमस्वरुपी सोबत राहण्याची शपथ घेत असतात. नवविवाहित दांपत्य खडकांना देवता मानून त्यांच्यासमोर आपला विवाह कायमस्वरुपी टिकू दे अशी प्रार्थना करतात. शिंटो खडकाच्या मान्यतेनुसार खडक पुरुष आणि महिलेच्या विवाहाच्या मिलनाचे जल्लोष करतात.
मोठ्या संख्येत लोक देतात भेट
खडकांची धार्मिक मान्यता आणि त्याच्या चहुबाजूला असलेले नैसर्गिक सौंदर्य पाहता लोक मोठ्या संख्येत येथे येत असतात. खडकांना पाहण्याचा सर्वात चांगला कालावधी उन्हाळ्यात सकाळचा असतो. खडकांकडून सुर्योदयाचे दृश्य पाहणे अत्यंत अद्भूत असते.