सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉयच्या कामगिरीवर लक्ष
वृत्तसंस्था / लखनौ
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2025 च्या बॅडमिंटन हंगामातील सय्यद मोदी सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत एच. एस. प्रणॉय यांच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहील. भारताच्या आयुष शेट्टीने या स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे.
240,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या या स्पर्धेत विविध देशांचे अव्वल बॅडमिंटनपटू सहभागी होत आहेत.नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष सेनने जेतेपद मिळविले होते. तर आयुष शेट्टीने अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. किदांबी श्रीकांत आणि प्रणॉय हे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू वर्ष अखेरीच्या बॅडमिंटन हंगामातील याशेवटच्या स्पर्धेत जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील. श्रीकांतने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.
या स्पर्धेत पुरूष एकेरीत पाचव्या मानांकीत किदांबी श्रीकांतचा सलामीचा सामना मेरीबा मेसनामशी तर एच. एस. प्रणॉयचा सलामीचा सामना केविन थेंगामशी होणार आहे. सहाव्या मानांकीत तरुण मनीपल्लीचा पहिल्या फेरीतील सामना सतीशकुमार करुणाकरन बरोबर होईल. या स्पर्धेत राजवतचे पुनरागमन होणार आहे. महिलांच्या विभागात भारतच्या उन्नती हुडाचा सलामीचा सामना आकर्षी काश्यपबरोबर होणार आहे. आदिती भट्ट, अनमोल खर्ब, तन्वी शर्मा, अनुपमा उपाध्याय, तानिया हेमंत, रक्षिता श्री, श्रेया लेले यांचा सहभाग राहील. महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.